अनेक भाषांनी गायिली महन्मंगल श्रीराम कथा! | पुढारी

अनेक भाषांनी गायिली महन्मंगल श्रीराम कथा!

सचिन बनछोडे

मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्रांचा अवतार त्रेतायुगात झाला. त्यांचे समकालीन महर्षी वाल्मिकींनी रामरायाचे दिव्य चरित्र छंदोबद्ध काव्यात सुंदररीत्या गुंफले. हेच ‘वाल्मिकी रामायण’ म्हणून जगद्विख्यात आहे. वाल्मिकींनाच ‘आदिकवी’ म्हटले जाते.

वाल्मिकींनी रामरायाचे चरित्र जवळून पाहिले होते. इतकेच नव्हे तर सीतामातेने वाल्मिकींच्याच आश्रमात लव आणि कुश यांंना जन्म दिला होता. वाल्मिकींनी भगवान रामचंद्रांच्या या मुलांनाच सर्वप्रथम रामायणाचे पाठ दिले होते. एका समकालीन व्यक्तीने लिहिलेले श्रीरामाचे अधिकृत चरित्र म्हणूनही वाल्मिकी रामायणाची ख्याती आहे. भगवान श्रीरामांचा अवतार आणि लीला यांचा प्रभाव नंतरच्या काळात वाढतच गेला. अनेकांनी नंतर रामकथा आपापल्या भाषेत गायिली. भक्तिमार्गाला पुष्ट करणारी ही रामायणे नंतर वाल्मिकी रामायणाइतकीच प्रसिद्ध झाली.

वाल्मिकी रामायणानंतर संस्कृत भाषेत अनेक रामायणे लिहिली गेली. ब—ह्मांड पुराणाचा एक भाग असलेले अध्यात्म रामायण हे त्यामध्ये अधिक प्रसिद्ध आहे. ते वेदव्यासांनी लिहिले असे मानले जाते. ‘वसिष्ठ रामायणा’चीही ख्याती आहे. त्यालाच सर्वसामान्यपणे ‘योग वसिष्ठ’ म्हटले जाते; मात्र त्यात रामचरित्र नाही. अद्वैत वेदान्तपर तत्त्वज्ञानाचा वसिष्ठ ऋषींनी रामाला केलेला उपदेश आहे. पंधराव्या शतकात संस्कृतमध्ये आनंद रामायण लिहिण्यात आले. शिवाय अगस्त्य रामायण, अद्भुत रामायणासारखी अन्य काही संस्कृत रामायणे आहेत.

भारतातील प्राकृत भाषेत तसेच बृहद्भारतातील अन्य भाषांमध्येही रामायणे लिहिण्यात आली. बाराव्या शतकात तामिळी भाषेत ‘रामावतारम’ आणि कन्नडमध्ये रामचंद्र चरितपुराण लिहिण्यात आले. सोळाव्या शतकात अवधी भाषेत तुलसीदासांनी ‘रामचरितमानस’ लिहिले. संपूर्ण उत्तर भारतात घरोघरी या तुलसी रामायणाचे पठण होत असते. सतराव्या शतकात मल्याळी भाषेत ‘अध्यात्मरामायणम किलपट्टू’ लिहिले गेले. मराठीत संत एकनाथांनी भावार्थ रामायण लिहिले. श्रीधर स्वामींनी ‘श्रीरामविजय’ हा ग्रंथ लिहिला. आंध— प्रदेशात ‘श्रीरंगनाथ रामायणम’ हे तेलुगू रामायण चौदाव्या शतकात लिहिण्यात आले. याच काळात आसाममध्येही ‘सप्तकांड रामायण’ किंवा ‘कथा रामायण’ लिहिण्यात आले. तसेच सोळाव्या शतकात ‘गिती-रामायण’ किंवा ‘दुर्गाबारी रामायण’ लिहिले गेले. बंगालमध्ये पंधराव्या शतकात ‘क्रितीवासी रामायण’ लिहिले गेले. क्रितीबास ओझा यांनी लिहिलेले हे रामायण बंगालमध्ये लोकप्रिय आहे. बंगालमध्येच सोळाव्या किंवा सतराव्या शतकात ‘अद्भुत आचर्जेर रामायण’ झाले. कर्नाटकात तेराव्या शतकात ‘कुमुदेंदु रामायण’ आणि सोळाव्या शतकात ‘कुमार-वाल्मिकी तोरावे’ रामायण झाले. ओडिशात सोळाव्या शतकात ‘जगमोहन रामायण’ किंवा ‘दंडी रामायण’ झाले. तामिळनाडूत बाराव्या शतकात ‘कंब रामायण’ झाले. भगवान श्रीरामाची ही चरित्रकथा अशी अनेकांनी भक्तिभावाने आपापल्या भाषेत, आपापल्या पद्धतीने गायिली आणि त्यामुळे भक्तिधारा अधिकच पुष्ट झाली. आज संपूर्ण देशात आणि देशाबाहेरही रामकथा अजरामर व नित्यनूतन असण्यामागे हे एक कारण आहे.

Back to top button