Aditya L1 Mission: तारीख ठरली! ‘आदित्य एल-१’ या दिवशी ‘लॅगरेंज पॉईंट१’ वर पोहचणार | पुढारी

Aditya L1 Mission: तारीख ठरली! 'आदित्य एल-१' या दिवशी 'लॅगरेंज पॉईंट१' वर पोहचणार

पुढारी ऑनलाईन डेस्क: भारताचे सूर्ययान ‘आदित्य-L1’ हे लवकरच म्हणजे ६ जानेवारी २०२४ रोजी त्याच्या निश्चित स्थळी म्हणजे ‘लॅगरेंज पॉईंट१’ वर पोहचणार आहे. जे ठिकाण पृथ्वीपासून १.५ दशलक्ष किलोमीटर अंतरावर आहे, अशी माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी शुक्रवारी (दि.२३) दिली आहे. या संदर्भातील वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे. (Aditya L1 Mission)

भारतीय विज्ञान या स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या विज्ञान संमेलनाच्या कार्यक्रमावेळी शुक्रवारी(दि.२३) इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी माध्यमांशी बोलताना आदित्य एल-१ बाबतची अपडेट दिली आहे. यापूर्वी त्यांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात आदित्य एल-१ निश्चित केलेल्या ‘लॅगरेंज पॉईंट-१’ वर पोहचणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान सोमनाथ यांनी काल (दि.२३) एका कार्यक्रमादरम्यान ‘आदित्य एल-१’ त्याच्या निश्चित स्थळी म्हणजे ‘लॅगरेंज पॉईंट१’ वर ६ जानेवारीला पोहचणार असल्याचे सांगितले.

Aditya-L1 Mission Updates : काय आहे मोहिम ‘आदित्य-L1’ मोहिम

भारताचे सूर्यमोहिम अंतराळयान ‘आदित्य L1’ या मोहिमेचे प्रक्षेपण २ सप्टेंबर रोजी झाले. या मोहिमेत हे यान सुमारे १५ लाख किलोमीटर अंतर कापणार आहे. प्रक्षेपणानंतर १२५ दिवसांत यान सूर्याच्या सर्वात जवळच्या ‘लॅगरेंज पॉईंट L1’ बिंदूवर पोहोचेल. त्यानंतर याठिकाणी हे स्पेसक्राफ्ट स्थिरावणार आहे. तसेच पुढे ‘आदित्य L1’ अंतराळयान सूर्याची छायाचित्रे घेईल आणि पृथ्वीवर पाठवेल. दरम्यान सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये असलेला लिंग्रज पॉईंट एल-१ हा या मोहिमेतील अंतिम टप्पा आहे.

‘आदित्य एल-1’चा कालावधी पाच वर्षे

‘आदित्य एल-1’चा कालावधी पाच वर्षांचा असेल. या काळात तो सूर्याभोवती फेर्‍या मारेल आणि सूर्यावरील वादळे व अन्य घडामोडींसंबंधी माहिती मिळवेल. ‘चांद्रयान-3’प्रमाणेच ‘आदित्य एल-1’ सर्वप्रथम पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करेल. काही फेर्‍या मारेल. त्यानंतर १५ लाख किलोमीटरचा प्रवास करून ‘एल-1’ पॉईंटवर पोहोचेल. या पॉईंटवर फेर्‍या मारताना ‘आदित्य एल-1’ सूर्याच्या बाहेरच्या थराबद्दल माहिती देईल, असेही इस्रोकडून सांगण्यात आले आहे.

सूर्यमोहिमेतून अनेक रहस्ये उलगडणार

या मोहिमेच्या माध्यमातून ‘इस्रो’ सूर्याचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकेल. सूर्याच्या पृष्ठभागावरील तापमान, सौरवादळे, कॉस्मिक रेंज आणि इतर बर्‍याच गोष्टींचा अभ्यास करणे ‘इस्रो’ला शक्य होणार आहे. यासोबतच लॅग्रेंज पॉईंटजवळच्या कणांचाही अभ्यास ‘आदित्य एल-1’ करणार आहे. याशिवाय सूर्याबद्दल माहीत नसलेली अनेक रहस्ये उलगडली जातील. सूर्याचे जे वेगवेगळे थर आहेत, त्याबद्दल देखील माहिती मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे इस्रोने यापूर्वी दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button