Aditya L1 : आदित्य L1चे नेतृत्व ‘शेतकरी कन्ये’च्या हाती; ISRO च्या महिला शास्त्रज्ञ ‘निगार शाजी’ यांच्याविषयी…

Aditya L1 Nigar Shaji
Aditya L1 Nigar Shaji

पुढारी ऑनलाइन डेस्क : Aditya L1 : चंद्रावरील यशस्वी स्वारी नंतर भारताच्या महत्वाकांक्षी सूर्य मोहिमेचा पहिला टप्पा आज पार पडला. 'इस्रो'ने सुर्याचा अभ्यास करणाऱ्या 'आदित्य एल-1'चे आज शनिवारी (दि. १) सकाळी ११ वाजून ५० मिनिटांनी येथील सतीश धवन केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण केले. श्रीहरिकोटा येथील दुसर्‍या लाँच पॅडवरून 'पीएसएलव्ही-सी 57' हे रॉकेट 'आदित्य एल-1'ला घेऊन सूर्याच्या दिशेने झेपावले. भारताची ही पहिलीच सौरमोहीम आहे. आदित्य L1 चे नेतृत्व एका शेतकरी कुटुंबातील कन्या आणि एका महिला शास्त्रज्ञाच्या हातात आहे. निगार शाजी या महिला शास्त्रज्ञ आदित्य एल 1 च्या प्रकल्प संचालिका आहेत.

आदित्य एल-1 च्या यशस्वी प्रक्षेपणावर, प्रकल्प संचालिका निगार शाजी म्हणाल्या, हे स्वप्न सत्यात उतरल्यासारखे आहे. आदित्य एल-1 ला पीएसएलव्हीने निर्धारित कक्षेत स्थापित केल्याचा आनंद आहे. आदित्य एल-1 ने 125 दिवसांच्या प्रदीर्घ प्रवासाला सुरुवात केली आहे. एकदा का आदित्य L-1 कार्यान्वित झाल्यावर, ते देशासाठी आणि जागतिक वैज्ञानिक बंधुत्वासाठी एक संपत्ती असेल. हे मिशन शक्य करण्यासाठी त्यांच्या समर्थन आणि मार्गदर्शनासाठी मी संपूर्ण टीमचे आभार मानू इच्छिते, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. जाणून घेऊ या शेतकऱ्याची लेक ते आदित्यची एल 1 ची संचालिका आणि इस्रोची शास्त्रज्ञ निगार शाजी यांच्याबद्दल…

Aditya L1 : निगार शाजी शाळा ते महाविद्यालयीन शिक्षण

निगार शाजी (वय 59) या तामिळनाडूच्या दक्षिणेकडील टेंकासी जिल्ह्यातील असून मूळच्या शेंगोट्टाई येथील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील शेख मीरण हे शेतकरी होते आणि आई सैतून बीबी या गृहिणी आहेत. शाजी यांच्या भावाने द न्यू इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, निगार यांचे शालेय शिक्षण शेंगोट्टई येथील सरकारी उच्च माध्यमिक शाळेत इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले आहे. नंतर सेनगोटाईच्या एसआरएम गर्ल्स स्कूल येथून इंटरपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मदुराई येथील कामराज विद्यापीठात प्रवेश घेतला आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्समध्ये अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. बीआयटी, रांची येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये एमई पूर्ण केले, अशी माहिती ई टीव्ही भारतच्या निगार यांच्या मुलाखतीत दिली आहे.

Aditya L1 : इस्रोतील कारकीर्द

निगार यांनी 1987 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे प्रमुख केंद्र असलेल्या सतीश धवन स्पेस सेंटर (SHAAR) येथून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. काही काळ इथे काम केल्यानंतर त्यांची बंगळुरू येथील यूआर राव सॅटेलाइट सेंटरमध्ये बदली झाली. निगार यांनी बंगळुरू येथे विविध पदांवर काम केले. भारतीय रिमोट सेन्सिंग, कम्युनिकेशन आणि इंटरप्लॅनेटरी उपग्रहांच्या डिझाइन या कामांमध्ये त्यांचा महत्वाचा सहभाग होता. राष्ट्रीय संसाधन निरीक्षण आणि व्यवस्थापनासाठी ISRO द्वारे हाती घेतलेल्या भारतीय रिमोट सेन्सिंग उपग्रह रिसोर्ससॅट-2A साठी त्यांनी सहयोगी प्रकल्प संचालक म्हणूनही काम केले.

या प्रयोगांमध्ये, इमेज कॉम्प्रेशन, सिस्टम इंजिनीअरिंग आणि स्पेस इंटरनेट वर्किंग यांसारख्या महत्त्वाच्या पैलूंशी संबंधित शोधनिबंध सादर केले. या सर्व कामातून त्यांनी आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत.

Aditya L1 : यापेक्षा अधिक समाधानकारक काय – निगार शाजी

यूआर राव सॅटेलाइट सेंटरमध्ये कार्य करतानाच निगार यांना आदित्य मोहिमेचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्यांनी आदित्य एल 1 प्रकल्पाच्या संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला. या मिशन संबंधी निगार म्हणाल्या, आदित्य एल 1 सारखा प्रकल्प जो देशासाठी प्रतिष्ठेचा आहे त्याचे संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. यापेक्षा अधिक समाधानकारक काय असू शकते. इथे प्रत्येक पायरीवर आव्हाने आहेत. मात्र, ती अवघड वाटत नाहीत.

Aditya L1 : महिलांसाठी इस्रोमध्ये अनुकूल वातावरण

इस्रोमध्ये महिलांना काम करण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. देशभरातील इस्रोच्या केंद्रांमध्ये महिलांबाबत कुठेही भेदभाव किंवा असमानता होत नाही. आपण आपले लक्ष्य निवडले पाहिजे. त्यासाठी इस्रोकडून सर्वोत्तम प्रोत्साहन मिळते. इस्रोत आम्ही आमच्या काम आणि क्षमतांद्वारे ओळखलो जातो.

Aditya L1 : निगार यांचे वैयक्तिक आयुष्य

निगार यांचे पती दुबईत मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना दोन मुले आहेत. मुलाने फ्लुइड मेकॅनिक्समध्ये डॉक्टरेट केली आहे आणि तो नेदरलँडमध्ये कार्यरत आहेत. तर त्यांची मुलगी वैद्यकीय व्यवसाय करते. निगार यांची मुलगी आणि त्यांची आई या दोघीही त्यांच्यासोबत बंगळूर येथे राहतात.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news