Aditya L1 Mission : हा पाहा सूर्यनारायण; ‘आदित्य’च्या नजरेतून | पुढारी

Aditya L1 Mission : हा पाहा सूर्यनारायण; ‘आदित्य’च्या नजरेतून

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारताच्या आदित्य एल 1 यानाने टिपलेली सूर्याची छायाचित्रे इस्रोने जारी केली असून, त्यातून सूर्याच्या प्रकाशमंडळ आणि वर्णमंडळाची बहुमूल्य माहिती उपलब्ध होत असल्याचे म्हटले आहे.

भारताचे आदित्य एल 1 यान अजून आपल्या निर्धारित जागी पोहोचायचे आहे; पण त्याने गेल्या आठवड्यात कामाला प्रारंभ केल्याचे इस्रोने जाहीर केले होते. आता आदित्य यानाने टिपलेली छायाचित्रे इस्रोने जारी केली आहेत. आदित्य यानातील सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप अर्थात सूट या यंत्रणेने कामाला प्रारंभ केला आहे. सूर्याच्या पृष्ठभागावरून येणार्‍या विविध तरंगलांबींची अल्ट्राव्हायोलेट छबी टिपण्याचे काम हे सूट करीत आहे. 200 ते 400 नॅनो मीटर लांबींच्या तरंगांच्या आधारे सूर्याचे प्रकाशमंडळ आणि वर्णमंडळ यांची छायाचित्रे विविध फिल्टर्स वापरून तयार करण्यात आली आहेत. त्यातील काही छायाचित्रे इस्रोने जारी केली आहेत. या छायाचित्रांच्या माध्यमातून वैज्ञानिकांना सूर्याच्या चुंबकीय वातावरणातील घडामोडी असेच त्याचे होणारे परिणाम याचा अभ्यास करणे सोपे होणार आहे.

आदित्य यानावरील सूट ही यंत्रणा 20 नोव्हेंबर रोजी ऑन करण्यात आली. टप्प्याटप्प्याने ती पूर्ण कार्यान्वित झाल्यावर या दुर्बिणीने कामाला प्रारंभ केला. 6 डिसेंबर रोजी या सूट यंत्रणेने टिपलेली ही पहिली छायाचित्रे आहेत, असे इस्रोने म्हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button