Stock Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टी नव्या शिखरावर! FMCG तेजीत, जाणून घ्या आजचे ट्रेडिंग | पुढारी

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स, निफ्टी नव्या शिखरावर! FMCG तेजीत, जाणून घ्या आजचे ट्रेडिंग

पुढारी ऑनलाईन : भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीने आज मंगळवारी (दि.१९) नवा सर्वकालीन उच्चांक गाठला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ७१,६२३ अंकांवर झेप घेतली. तर निफ्टीने २१,५०० चा टप्पा पार केला. त्यानंतर सेन्सेक्स १२२ अंकांच्या वाढीसह ७१,४३७ वर बंद झाला. तर निफ्टी ३४ अंकांनी वाढून २१,४५३ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)

संबंधित बातम्या 

क्षेत्रीय पातळीवर संमिश्र कल

बाजारातील तेजीत पीएसयू बँका, एफएमसीजी शेअर्स आघाडीवर राहिले. क्षेत्रीय पातळीवर संमिश्र कल दिसून आला. मेटल, फार्मा, ऑईल आणि गॅस, पॉवर आणि एफएमसीजी ०.३ ते १ टक्क्यांनी वधारले. तर ऑटो, कॅपिटल गुडस, रियल्टी, आयटी क्षेत्रात घसरण दिसून आली. स्मॉलकॅप निर्देशांकाने किरकोळ वाढीसह बंद होण्यापूर्वी ४२,५४४.९५ चा नवा विक्रमी उच्चांक गाठला होता. तर बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.३ टक्क्याने घसरला.

कोणतेही मोठे ट्रिगर्स नसल्यामुळे शेअर बाजार नफा आणि तोटा या दरम्यान दोलायमान राहण्याची शक्यता असल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नेस्ले इंडियाचा शेअर टॉप गेनर

सेन्सेक्स आज ७१,४७९ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७१,६२३ पर्यंत वाढला. सेन्सेक्सवर नेस्ले इंडियाचा शेअर टॉप गेनर राहिला. हा शेअर ४.७० टक्के वाढीसह २५,५०० रुपयांवर पोहोचला. त्याबरोबर एनटीपीसी, रिलायन्स, हिंदुस्तान युनिलिव्हर, एसबीआय, आयटीसी, ॲक्सिस बँक, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स हे शेअर्स वाढले. तर विप्रो, एचसीएल टेक, मारुती, बजाजा फिनसर्व्ह, टीसीएस, टाटा स्टील, टेक महिंद्रा हे शेअर्स घसरले.

निफ्टी आज २१,४७७ वर खुला झाला होता. त्यानंतर त्याने २१,५०० चा टप्पा पार केला. निफ्टीवर नेस्ले इंडिया, कोल इंडिया, एनटीपीसी, टाटा कन्झूमर, सिप्ला हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. हे शेअर्स १.५० ते ४.९५ टक्क्यांदरम्यान वाढले. तर हिरो मोटोकॉर्प, अदानी पोर्टस्, एसबीआय लाईफ, अदानी एंटरप्रायजेस, यूपीएल हे शेअर्स घसरले.

स्पाइसजेटचे शेअर्स वधारले

गो फर्स्टला घेण्यास स्वारस्य दर्शविल्यानंतर आज स्पाइसजेटचे शेअर्स (Shares of SpiceJet) सुमारे ८ टक्क्यांनी वाढले. त्यानंतर दुपारच्या व्यवहारात हा शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक वाढून ६६.३० रुपयांवर होता. पीटीआयच्या वृत्तानुसार, प्रॅट अँड व्हिटनी इंजिनच्या समस्यांमुळे आर्थिक अडचणीत आलेल्या गो फर्स्टने ३ मे रोजी उड्डाण सेवा थांबवली होती. त्यामु‍ळे गो फर्स्ट सध्या दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेतून जात आहे.

यामुळे बाजारात तेजी

देशातील महागाईत झालेली घट, जीडीपीतील मजबूत वाढ, मजबूत कॉर्पोरेट कमाई आणि आगामी २०२४ मध्ये व्याजदर कमी होण्याच्या अपेक्षेने भारतीय शेअर बाजारात गेल्या दोन महिन्यांत तेजी राहिली. (Stock Market Closing Bell)

निक्केई उच्च पातळीवर बंद

बँक ऑफ जपानने त्यांचे अत्यंत सैल पतविषयक धोरण कायम ठेवल्यानंतर येन चलन डॉलरच्या तुलनेत घसरले. दरम्यान, टोकियोतील निर्देशांक मंगळवारी उच्च पातळीवर बंद झाला. बेंचमार्क निक्केई २२५ निर्देशांक १.४१ टक्के म्हणजेच ४६०.४१ अंकांनी वाढून ३३,२१९.३९ वर पोहोचला. तर व्यापक टॉपिक्स निर्देशांक ०.७३ टक्क्यांनी वाढून २,३३३.८१ वर बंद झाला.

Back to top button