River Linking Project : नद्याजोड प्रकल्पामुळे दुष्काळाला आमंत्रण; IIT मुंबई, IITM पुण्याचे संशोधन | पुढारी

River Linking Project : नद्याजोड प्रकल्पामुळे दुष्काळाला आमंत्रण; IIT मुंबई, IITM पुण्याचे संशोधन

River Linking Project : मध्य भारतातील पर्जन्य घटल्याचा निष्कर्ष

मोहसीन मुल्ला

नदीजोड प्रकल्प हा भारतात अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. ज्या नद्यांना जादा पाणी आहे आणि पूरस्थिती निर्माण होते अशा भागांतील नद्या दुष्काळी भागांना जोडण्याचे विविध प्रकल्प गेली चार दशके भारतात विविध राज्यांत सुरू आहेत. असे प्रकल्प म्हणजे दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय म्हणून पाहिजे जात आहे; पण संशोधकांनी नदीजोड प्रकल्पाचा दुष्काळ निवारणात कोणताच फायदा होणार नाही, असे निष्कर्ष काढले आहेत. भारतात आणि जगात सुरू असलेले नद्याजोड प्रकल्प मान्सूच्या चक्रावर परिणाम करतात, त्यामुळे देशातील पाण्याचा ‘ताण’ वाढेल आणि या प्रकल्पांचा उद्देश साध्य होणार नाही, उलट याचा नकारात्मक परिणाम दिसून येईल, असे संशोधकांनी म्हटले आहे. (River Linking Project)

Nature Communication या जगप्रसिद्ध नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT मुंबई), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजी (IITM पुणे) या दोन संस्थेतील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे. तेजस्वी चौहान, अंजना देवानंद, मॅथ्यु कॉल रॉक्सी, करुमुरी अशोक आणि सुबिमल घोष यांनी हे संशोधन केले आहे.

गंगा, महानदी, गोदावरी, कृष्णा, कावेरी, नर्मदा आणि तापी नद्यांच्या खोऱ्यांचा १९९१ते २०१२ या काळातील अभ्यास करून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. या नद्यांच्या खोऱ्यातील मे आणि ऑक्टोबरमधील पावसाचा अभ्यास यात करण्यात आला. प्रादेशिक हवामानाचे मॉडेल, उपलब्ध आकडेवारीचा नव्याने अभ्यास एका खोऱ्यातील पाणी दुसऱ्या खोऱ्यात नेल्यामुळे होत असलेले हवामानातील बदल, याच El-Nino Souther Oscillation वर कसा परिणाम होतो याचा सविस्तर अभ्यास करण्यात आला. नदीखोऱ्यांतील ओलाव्यावर नियंत्रण ठेवणारा महत्त्वाचा भाग El-Nino Souther Oscillation आहे, असे संशोधनात म्हटले आहे.

गणिती सिद्धांतावरील नदीजोड प्रकल्प | River Linking Project

नदीजोड प्रकल्प हा गणिताच्या सिद्धांतावर आधारित आहे. Surplus and Deficit या तत्त्वावर नद्याजोड प्रकल्प राबवला जात आहे. ज्या नदीच्या खोऱ्यात अधिकचे पाणी आहे, तेथून कमी पाणी असलेल्या नदीच्या खोऱ्यात पाणी न्यायचे अशी संकल्पना आहे. जास्तीतजास्त पाणी जमिनीवरच ठेवले तर ते पाणी समुद्रात जाणार नाही, त्यामुळे देशाच्या पाण्याची वाढती गरज भागवली जाईल, अशी मांडणी केली जाते. “नदी खोरे हे स्वतंत्ररीत्या काम करते आणि त्याचा जमिनीवर, खोऱ्यातील हवामानावर कोणताही परिणाम होत नाही, असे ग्राह्य धरण्यात आले आहे; पण ही गृहितकं चुकीची आहेत, असे अभ्यासात दिसते,” असेही या संशोधनात म्हटले आहे.

नद्याजोड प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर खोदाई, बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे दुष्काळी भागातील पावसावर नकारात्मक परिणाम होतो, असे दिसून आले आहे. या भागात सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसात १२ टक्के घट झाली असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

नद्यांची खोरी आणि पर्जन्यमान | River Linking Project

नद्यांची खोरी ही स्वतंत्र कार्यरत नाहीत. जमीन आणि हवामान यांच्या फीडबॅक लूपने ती एकमेकांना जोडली आहेत. एका खोऱ्यातील पाणी बाष्पीभवनाच्या माध्यमातून दुसऱ्या खोऱ्यात पोहोचते. समजा एखाद्या खोऱ्यातील पाणी दुसरीकडे नेले तर या खोऱ्यातील कमी झालेल्या पाण्याचा परिणाम हवेतील ओलाव्यावर होतो आणि हवेचा पॅटर्न बदलतो. याचा परिणाम उन्हाळी पावसावर होतो आणि त्यातून फीडबॅक लूप निर्माण होतो, त्याचा नकारात्मक परिणाम पाण्याची उपलब्धता आणि हवामानाच्या पॅटर्नवर होतो. उदाहरणात गंगेच्या खोऱ्यातील ओलावा छत्तीसगड, ओडिशा आणि महानदीच्या खोऱ्यातील पाऊस निर्मितीवर होतो असतो, असे या संशोधनात म्हटले आहे.
मातीतील ओलावा कमी झाल्याने राजस्थान ते पूर्व किनारपट्टी अशा संपूर्ण मध्य भारतात उष्णता वाढली आहे, त्यामुळे पाऊस कमी झालेला आहे. याची तीव्रता La Nina सक्रीय असताना जास्त जाणवते, असेही संशोधकांनी म्हटले आहे.

नदीजोड प्रकल्प काय आहे?

National Perspective Plan for Inter Basin Transfer या प्रकल्पानुसार द्विकल्पीय भारतात १६ आणि हिमालयीन भागात १४ प्रकल्प असल्याचे म्हटले आहे. यातून १७४ अब्ज घनमीटर पाण्याचे वहन केले जाणार आहे. यासाठी ३ हजार धरण आणि १५००० किलोमीटर लांबीचे कालवे बांधले जाणार आहेत. यातून कोटी हेक्टर इतकी जमीन ओलिताखाली येईल आणि ३४००० मेगावॅट इतकी वीज निर्मिती होणार आहे; पण नव्याने झालेल्या या संशोधनात नदीजोड प्रकल्पाची उपयुक्ततेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले आहेत.

हेही वाचा

Back to top button