OCCRP चे अदानी नंतर ‘वेदांता’ टार्गेट! पर्यावरण नियमांना बगल देण्यासाठी लॉबिंग केल्याचा आरोप | पुढारी

OCCRP चे अदानी नंतर 'वेदांता' टार्गेट! पर्यावरण नियमांना बगल देण्यासाठी लॉबिंग केल्याचा आरोप

पुढारी ऑनलाईन : शोध पत्रकारितेतील जागतिक नेटवर्क असलेल्या ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) ने अदानी नंतर आता खाण क्षेत्रातील दिग्गज कंपनी वेदांताला लक्ष्य केले आहे. अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांताचा कोरोना साथीच्या दरम्यान मुख्य पर्यावरणीय नियम कमकुवत करण्यासाठी केलेल्या “गुप्त” लॉबिंग मोहिमेमागे हात होता, असा आरोप ओएसएसआरपीने केला आहे. याबाबतचा रिपोर्ट गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात म्हटले आहे की भारत सरकारने सार्वजनिक सल्लामसलत न करता बदल मंजूर केले आणि तज्ज्ञांच्या मते बेकायदेशीर पद्धती वापरून त्यांची अंमलबजावणी केली.

OCCRP ने जानेवारी २०२१ मध्ये नमूद केले होते की, वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी माजी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना सांगितले होते की, नवीन पर्यावरणीय मंजुरीविना खाण कंपन्यांना उत्पादन ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची परवानगी देऊन सरकार देशाच्या आर्थिक सुधारणेला चालना देऊ शकते.

ओसीसीआरपीला अब्जाधीश जॉर्ज सोरोस निधी पुरवतात. या संघटनेने दावा केला आहे की वेदांताचा तेल व्यवसाय असलेल्या केयर्न इंडियाने सरकारी लिलावात बाजी मारण्यासाठी तेल ब्लॉक्समधील शोधाच्या ड्रिलिंगसाठीची सार्वजनिक सुनावणी रद्द करण्यासाठी यशस्वीपणे लॉबिंग केले. तेव्हापासून केयर्नच्या राजस्थानमधील वादग्रस्त तेल प्रकल्पांपैकी सहा प्रकल्पांना स्थानिक विरोधाला न जुमानता मान्यता देण्यात आली आहे, असे OCCRP रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

OCCRP ने असाही दावा केला आहे की त्यांनी मिळवलेल्या हजारो भारतीय सरकारी दस्तऐवजांचे विश्लेषण केले आहे. यात मेमो तसेच बंद दरवाजाच्या आड घेतलेल्या बैठकीच्या इतिवृत्तांपासून आणि अगदी वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्या पत्रांच्या त्यात नोंदी आहेत.

ओसीसीआरपीचा अदानींविरोधातील रिपोर्ट काय सांगतो?

वेदांतावरील OCCRP चा रिपोर्ट हा अदानी समूहाविषयीचा रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यानंतर एक दिवसानंतर समोर आला आहे. ऑर्गेनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) ने गौतम अदानी समुहावर शेअर्समध्ये फेरफारीचा आरोप केला आहे. ओएसएसआरपीच्या अहवालानुसार, अदानी समूहाने गुपचूपपणे स्वत:चे शेअर्स खरेदी करून शेअर बाजारात लाखो डॉलर्स गुंतवले आहेत. ओएसएसआरपीने हा अहवाल गार्डियन आणि फायनान्शियल टाइम्स सोबत शेअर केला होता.

यात अदानी यांनी केलेल्या व्यवहाराची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. अदानी समुहातील कंपन्यांनी २०१३ ते २०१८ दरम्यान त्यांच्याच शेअर्समध्ये पैसे गुंतवले असल्याचे त्यात म्हटले आहे. ओएसएसआरपीने आरोप केला आहे की, प्रमोटर परिवाराच्या भागीदारांद्वारे मॉरिशस येथील एका निनावी गुंतवणूक निधीद्वारे अदानी समूहाच्या शेअर्समध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. दरम्यान, अदानी समुहाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

ओएसएसआरपी संघटनेला अब्जाधीश जॉर्ज सोरोस आणि रॉकफेलर ब्रदर्स फंड यांच्यासारख्या संस्थांकडून निधी मिळतो. जॉर्ज सोरोस हे अब्जाधीश असून त्यांनी अनेकवेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. याआधी जानेवारी माहिन्यात अमेरिकेतील शॉर्ट सेलर हिंडेनबर्गने अदानी समुहावर फसवणूक आणि स्टॉक किंमतीत फेरफार केल्याचा आरोप केला होता.

मल्टिपल टॅक्स हेव्हन्स आणि अदानी समुहाच्या अंतर्गत ईमेलच्या फायलींच्या आढाव्याचा हवाला देत नॉन-प्रॉफिट मीडिया संस्था OCCRP ने म्हटले आहे की, त्यांच्या तपासणीत किमान दोन प्रकरणे आढळून आली आहेत, जिथे गुंतवणूकदारांनी अशा ऑफशोर स्ट्रक्चर्सद्वारे अदानी शेअर्सची खरेदी आणि विक्री केली.

 हे ही वाचा :

Back to top button