पर्यावरण : जीवसृष्टीच धोक्यात! | पुढारी

पर्यावरण : जीवसृष्टीच धोक्यात!

डॉ. व्ही. एन. शिंदे

वायू आणि जमिनीचे प्रदूषण, त्यातून वाढणारे वैश्विक तापमान याचा परिणाम अनेक प्रजातींवर होत आहे. निसर्ग आता विनाशाच्या टोकाकडे जात आहे. 2030 पर्यंत जागतिक तापमानवाढीवर नियंत्रण न मिळवल्यास पृथ्वीवरील जीवसृष्टीच नष्ट होणार, असा पर्यावरणतज्ज्ञांनी इशारा दिला आहे. आज प्रजाती नष्ट होण्याचा वेग हजार पटींनी वाढला आहे. जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

मागील काही वर्षांपासून हवामान बदलाच्या चर्चा सुरू आहेत. त्याचे एकेक परिणाम जगासमोर येत आहेत. अचानक पाऊस येणे, ढगफुटीसारखा पाऊस पडणे, जेथे कधीच वादळ येत नव्हते, त्या भागात वादळांची वारंवारिता वाढणे, चांगला पाऊस येणार्‍या प्रदेशात दुष्काळाचे चित्र अनुभवावे लागणे, तापमानात अचानक उष्णता वाढणे, कडकडीत थंडी पडणे, असे परिणाम भविष्यात दिसणार, हे वारंवार सांगण्यात येते. नागपूरला आलेला पूर, कोल्हापूरला दुष्काळासारखे चित्र निर्माण होणे, न्यूयॉर्कमध्ये पूरस्थिती निर्माण होणे, उत्तर भारतात उद्भवलेली अतिवृष्टी आणि त्यातून आलेला पूर या सर्व घटना हवामान बदलाचे परिणाम असल्याचे मानले जाते. हे खरेही आहे. मात्र, आता याहून बिकट परिस्थिती निर्माण होत आहे. काळजी वाढवणारी माहिती असलेला एक शोधनिबंध नुकताच जगप्रसिद्ध ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. त्यानुसार जगभरातील उभयचर गटातील अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

शेती, लाकडांची गरज भागवण्यासाठी होणारी जंगलतोड, लावले जाणारे वणवे, पाण्याची घटणारी उपलब्धता, पाण्याचे होत असलेले प्रदूषण, वायू आणि जमिनीचे प्रदूषण, त्यातून वाढणारे वैश्विक तापमान याचा परिणाम अनेक प्रजातींवर होत आहे. निसर्ग आता विनाशाच्या टोकाकडे जात आहे. 2030 पर्यंत जागतिक तापमान वाढीवर नियंत्रण न मिळवल्यास पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होणारच, असा पर्यावरणतज्ज्ञांनी इशारा दिला आहे. संशोधकांच्या अहवालांमध्ये ‘इंटरगव्हर्न्मेंटल पॅनेल फॉर क्लायमेट चेंज’ आपला अहवाल वेळोवेळी सादर करते. संयुक्त राष्ट्रसंघ त्याची गांभीर्याने दखल घेते. या अहवालाचीही संयुक्त राष्ट्रसंघाने गंभीर दखल घेतली आहे. पृथ्वीचे वाढत जाणारे तापमान याचा उघड पुरावा आहे. ‘इंटरगव्हर्न्मेंटल सायन्स पॉलिसी प्लॅटफॉर्म ऑन बायोडायव्हर्सिटी अँड इको-सिस्टीम सर्व्हिसेस’मार्फत प्रसिद्ध झालेल्या अहवालात जैवविविधता टिकून राहावी, यासाठी नेमके काय करायला हवे, याचेही विवेचन आहे.

‘नेचर’मध्ये प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधात उभयचर प्राण्यांच्या अस्तित्वासंदर्भातील शोध, त्यातून काढलेले निष्कर्ष आणि उपाययोजना, यावर भाष्य केले आहे. मात्र, त्याही पुढे ‘इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर’ने जगभरातील कोणत्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, याची यादीच जाहीर केली आहे. त्यावर नजर टाकली की, निसर्गाची किती हानी झाली आहे, ते स्पष्ट होते. अधिवास नष्ट झाल्याने नामशेष होणार्‍या प्रजातींचा अभ्यास करून अहवाल तयार केला आहे. त्यासाठी एक लाख प्रजातींचा अभ्यास केला आहे. सर्वप्रकारच्या 25 टक्के प्रजातींचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तीस टक्के माशांच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. 40 टक्क्यांपेक्षा जास्त सस्तन प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सरपटणार्‍या आणि उभयचर प्राण्यांच्या प्रजातीतील साधारणत: 45 टक्क्यांपेक्षा जास्त प्रजाती नष्ट होतील. सर्वात जास्त धोका पक्षांना निर्माण झाला आहे. त्यामागील महत्त्वाचे कारण म्हणजे, त्यांचे महत्त्वाचे अधिवासाचे ठिकाण झाड, हेच आपण संपवत चाललो आहोत. पक्ष्यांच्या सुमारे 55 टक्के प्रजाती लवकरच नामशेष होतील.

एकूणच सजीवसृष्टीचा विचार केला, तर हे भीतीदायक चित्र आहे. दर चारपैकी एक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 40 टक्के उभयचर, 34 टक्के शंकाकृती झाडे, 33 टक्के प्रवाळ, 31 टक्के माशांतील शार्क आणि रे, 27 टक्के कठीण आवरण किंवा कवच असलेले जीव, 25 टक्के सस्तन प्राणी आणि 14 टक्के पक्षी प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. ही पाहणी अजूनही सुरू आहे आणि सुधारित अहवालात येणारे चित्र यापेक्षा भयावह असेल. मुळात आजही नेमकी झाडे, पशू, पक्षी, बुरशी किती संख्या आहे, हे समजू शकलेले नाही. संशोधक त्यांची संख्या वीस लाखांपेक्षा जास्त, तर काही संशोधक एक कोटीपेक्षा जास्त असल्याचे सांगतात.

मोठ्या प्रमाणात प्रजाती नष्ट होण्याचा प्रकार गत पाच कोटी वर्षांमध्ये सहावेळा घडला. सुमारे साडेसहा कोटी वर्षांपूर्वी अशनी पडल्याने अशाच मोठ्या प्रमाणात विविध प्रजाती नष्ट झाल्या होत्या. औद्योगिक क्रांती घडेपर्यंत हे घडत असायचे. ते निसर्ग घडवत असे. तो एक नैसर्गिक प्रक्रियेचा भाग होता. यावेळी ही बाब निसर्गातील वाढता हस्तक्षेप आणि त्यामुळे होणारी जागतिक तापमान वाढीमुळे घडत आहेत. आज प्रजाती नष्ट होण्याचा वेग हजार पटींनी वाढला आहे. विशेष म्हणजे, ज्या भागात नैसर्गिक जैवविविधता आणि सौंदर्य मुबलक आहे, त्या भागात हा वेग जास्त आहे. आफ्रिका खंडातील सस्तन प्राण्यांची संख्या झपाट्याने घटत आहे. एकविसाव्या शतकाच्या अखेरीस जवळपास पन्नास टक्के पक्षी आणि सस्तन प्राण्यांच्या प्रजाती नष्ट झालेल्या असतील.

यामागे संशोधकांनी अधिवास नष्ट होणे, प्राण्यांचा छळ, आक्रमक प्रजाती आणि आजार, प्रदूषण आणि हवामान बदल, असे गट पाडले आहेत. यामध्ये अनेक कारणे दिसत असली, तर प्रमुख कारण हे हवामान बदल आहे आणि हवामान बदलामागे तापमानवाढ आहे. तापमानवाढीमागे मानवाचा निसर्गातील हस्तक्षेप आहे. या हवामान बदलांचा सर्वाधिक फटका जलचर, सस्तन प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या प्रजातींना बसतो. पशू, पक्षी यांची होणारी तस्करी, मांसासाठी आणि औषधी घटकांसाठी होणारी शिकार वेगाने घटणारे जंगलांचे प्रमाण, वाढते औद्योगिकीकरण, पर्यटन, विकासासाठी होत असणारा वाढता निसर्गातील हस्तक्षेप, प्रदूषण या सर्वांचा परिणाम जैवविविधतेवर होत आहे. केवळ 2015 या एका वर्षात जगभरातील 60 दशलक्ष जमीन जंगलमुक्त करण्याचा पराक्रम मानवाने गाजवला आहे आणि दरवर्षी जंगलांचे प्रमाण आणखी घटत आहे.

भारत आणि जगातील सर्वच देशांमध्ये हे घडत आहे. निसर्ग वाचला पाहिजे, जैवविविधता टिकली पाहिजे, प्रदूषण कमी झाले पाहिजे, यावर सर्वच राष्ट्रांचे एकमत होते. मात्र हे कोणी करावे, असा मुद्दा आला की प्रत्येकजण दुसर्‍याकडे बोट दाखवतो. मुळात पृथ्वीवर 70 टक्के भाग पाण्याखाली तर 30 टक्के जमीन आहे. त्यातील केवळ सात टक्के भाग मानवी हस्तक्षेपाशिवाय राहिला आहे. त्या भागालाही हवामान बदलाचे फटके बसत आहेत. यातील सर्वात संवेदनशील जीव आहेत सस्तन प्राणी आणि उभयचर. या जीवांना हवामान बदलाच्या तडाख्यात स्वत:चे अस्तित्व टिकवणे कठीण बनत आहे.

यातील उभयचर प्राण्यांबाबत स्वतंत्र अहवाल प्रसिद्ध झाला आहे. उभयचर प्राण्यांचा अभ्यास अचूक करणे शक्य होते कारण ते ऋतू कोणताही असो, त्यांचा अधिवास नेमका ओळखणे शक्य होत असते. या अहवालातील निरीक्षणे आणि निष्कर्ष चिंता वाढवणारे आहेत. त्यातील भारताचा विचार केला तर भारताल लाभलेल्या विशाल किनारपट्टी आणि वैविध्यपूर्ण भूभागात एकूण 472 उभयचर प्राण्यांच्या प्रजाती आहेत. त्यातील पन्नास टक्के स्थानिक प्रजाती आहेत. त्यातील पंचेचाळीस टक्के प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. बेडकांच्या अनेक प्रजाती लुप्त होत आहेत. त्यांतही शेतात आढळणार्‍या अनेक प्रजाती आज दिसत नाहीत. यामागे निव्वळ हवामान बदल हे कारण नाही. मानवाने शेतामध्ये वापरलेली रासायनिक किटकनाशके आणि तणनाशके यांचाही परिणाम जैवसाखळीवर झालेला आहे. या साखळीतील मधल्या टप्प्यावरील अनेक जीव नष्ट झाल्याने बेडकांना घातक असणार्‍या बुरशीजन्य जीवांनी लक्ष्य केले आहे.

सुदानमध्ये उत्तरेत आढळणारा शेवटचा एकशिंगी पांढरा गेंडा 2018 साली मरण पावला. गेंडा हा मोठा सहज डोळ्यांना दिसणारा जीव असल्याने त्याची नोंद तरी झाली. मात्र अजूनही जगात नेमक्या सजीवांची संख्याच माहीत नसल्याने किती प्रजाती नष्ट होत आहेत, याचे अंदाजच वर्तवता येऊ शकतात. निसर्गातील वाढत्या हस्तक्षेपाचा सर्वात शेवटचा दृश्य परिणाम हवामान बदल आहे. त्यातून सजीवांवर होणार्‍या परिणामातील नेमकी नोंद घेता येईल, असा घटक उभयचर असल्याने, त्याची नोंद चर्चेत आली. तरीही, मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे, प्रदूषणामुळे, नैसर्गिक संसाधनाच्या लुटीमुळे, भूचर, उभयचर, जलचर, वनस्पती, पाणवनस्पती, विषाणू आणि जिवाणू सर्वांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. यातील काही जीव स्वत:मध्ये बदल करून टिकतील. मात्र त्या जीवांचा नवा अवतार मानवाला पूरक असेलच, असे नाही. तो मानवासाठी घातकही असू शकतो. म्हणूनच सर्वांना जगू दिले पाहिजे.
( लेखक पर्यावरण, विज्ञान अभ्यासक व शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव आहेत. )

Back to top button