Karnataka Politics: कर्नाटकच्या ‘अजित पवारां’चा शोध! | पुढारी

Karnataka Politics: कर्नाटकच्या 'अजित पवारां'चा शोध!

पुढारी ऑनलाईन: प्रेमात, युद्धात आणि आता राजकारणात सगळंच क्षम्य झालेले आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी शिवसेना फुटून सत्तांतर झाले आणि गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस फुटून आधीच्या सत्तांतराला टेकू मिळाला. कर्नाटकातही असेच सत्तांतर घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत; विरोधात बसावे लागलेल्या भाजपकडून आणि सत्ताधारी काँग्रेसमधल्या नाराजांकडूनही. (Karnataka Politics)

कर्नाटकातील सत्ताधार्‍यांमध्ये अजित पवारच जास्त आहेत, हे भाजपचे ज्येष्ठ नेते ईश्वरप्पा यांनी केलेले वक्तव्य काँग्रेसमधील नाराजी आणि भाजपचा सत्तातुरपणा या दोन्हींचे निदर्शक आहे. काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणण्याची कामगिरी करणारे शिलेदार म्हणून डी. के. शिवकुमार यांनाच मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी काँग्रेसच्या 136 पैकी बहुतेक आमदारांची इच्छा होती. मात्र 2018 मध्ये सर्वांत मोठा पक्ष ठरूनही मुख्यमंत्रीपद हुकल्याचे दुःख उरी बाळगून काँग्रेस नेते सिद्धरामय्यांनी आपलेच सरकार अस्थिर केल्याचा अनुभव पाठीशी असल्यामुळे सोनिया गांधींनी सिद्धरामय्यांना मुुख्यमंत्री बनवले आणि शिवकुमारांना मिळाले उपमुख्यमंत्रीपद. त्या दिवसापासूनच सिद्धरामय्या प्रशासकीय अधिकारी आणि स्वकीय आमदारांवरील आपली पकड घट्ट करण्यात गुंतले आहेत, तर शिवकुमार गटाचे आमदार, अडीच वर्षांनी का होईना, मुख्यमंत्रीपद मिळेल या आशेवर आहेत. त्यात गेल्या दोन महिन्यांत तिसरा गट सक्रिय होऊ लागला आहे. तो गट आहे बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांचा. (Karnataka Politics)

जारकीहोळी हे कर्नाटकाच्या राजकारणातील रेड्डी बंधूंनंतरचे दुसरे सर्वांत प्रभावशाली बंधू. जारकीहोळी हे एकूण पाच भावांचे कुटुंब. पैकी चौघे आमदार आहेत; तिघे कधी ना कधी मंत्री राहिलेले. सध्या सतीश जारकीहोळी सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत, तर रमेश आणि भालचंद्र भाजपकडून आमदार आहेत. लखन विधान परिषदेवर आहेत. 2019 मध्ये रमेश जारकीहोळी यांच्या बंडखोरीमुळेच ऑपरेशन कमळमधून 17 काँग्रेस आमदार भाजपमध्ये गेलेे आणि काँग्रेस-निजद युती सरकार पडले. ही रमेश यांची कामगिरी. (Karnataka Politics)

Karnataka Politics: मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा राजकारणात वाढता दबदबा

सिद्धरामय्या हे मूळ जनता दलाचे नेते. देवेगौडांनी निधर्मी जनता दल स्थापन केल्यानंतर ते निजदमध्ये गेले. पण त्यांना काँग्रेसमध्ये आणण्याचे श्रेय जाते सतीश जारकीहोळी यांना. सतीश हेही मूळ देवेगौडांचेच अनुयायी. पण ते काँग्रेसमध्ये गेले आणि काही काळानंतर त्यांनी सिद्धरामय्यांनाही आणले. थोडक्यात 2004 नंतर काँग्रेसला नवसंजीवनी देण्यात सतीश यांचाही वाटा आहे. ते सतीश आता शिवकुमार आणि त्यांच्या गटातील आमदारांच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्याची दोन प्रमुख कारणे. पहिले म्हणजे सतीश यांनाही उपमुख्यमंत्रीपद पाहिजे होते. ते दिले गेले नाही. दुसरे म्हणजे शिवकुमार गटाच्या नेत्या आणि महिला-बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा कर्नाटकाच्या राजकारणात वाढत चाललेला दबदबा.

शिवकुमार मुख्यमंत्री असते, तर उलथापालथी घडल्याही असत्या

काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गृहलक्ष्मी ही योजना सत्तेवर येताच लागू केली. प्रत्येक कुटुंबप्रमुख महिलेला महिना 2 हजार रु. देणारी ही योजना लोकप्रिय झाली आहे, त्याबरोबर ती योजना राबवणार्‍या मंत्री हेब्बाळकरही. जणू हेब्बाळकरांचीच ही योजना, असा प्रचार सुरू आहे. ज्येष्ठ असलेल्या सतीश यांना तो प्रचार खटकणारा आहे. त्यामुळे त्यांनी आपल्या 30 आमदारांची वेगळी मोट बांधली आहे. फक्त निर्णय काय घ्यायचा, याच विचारात ते दिसतात. त्यामुळेच बेळगावचे पालकमंत्रीपद आणि सार्वजनिक बांधकाम हे प्रभावशाली खाते असूनही गेल्या सहा महिन्यांत त्यांनी एकही लक्षणीय निर्णय घेतलेला नाही, की उल्लेखनीय योजनेची घोषणाही केलेली नाही. सिद्धरामय्यांऐवजी शिवकुमार मुख्यमंत्री असते, तर कदाचित आतापर्यंत उलथापालथी घडल्याही असत्या.

सरकार पाडण्याचे कसून प्रयत्न सुरू

2011 पासूनच ऑपरेशन कमळ राबवून आमदारांना फोडणार्‍या भाजपने काँग्रेसमधल्या या संघर्षाला खतपाणी घातले नसते तरच नवल. कसेही करून किमान 40 आमदार फोडायचे प्रयत्न भाजप करतो आहे, हे लपून राहिलेले नाही. माजी मुख्यमंत्री येडियुराप्पांसह सारेच नेते सरकारच्या पतनाची भाषा करतात, तेव्हा सरकार पाडण्याचे प्रयत्न कसून सुरू आहेत, याची जाणीव होते. या प्रयत्नांना जोड मिळालेय ती लोकसभेसाठी भाजप आणि निजदच्या झालेल्या युतीची. ही युती राज्यातही सत्तेवर आणण्याचे स्वप्न अनेक नेते आता बाळगून आहेत. त्यांना केंद्रिय नेतृत्त्वाकडूनही साथ मिळते आहे.

अन्यथा, कर्नाटकाचाही ‘महाराष्ट्र’

पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले दोन महिने कर्नाटकाचे मुुख्यमंत्री सिद्धरामय्यांना भेटण्याची वेळ देत नाहीएत, यावरून सत्तासंघर्षाचा अंदाज येतो. मात्र राजस्थान, मध्य प्रदेशसह पाच राज्यांत होणार्‍या निवडणुकांचा निकाल काय येतो, यावर कर्नाटकात किती प्रयत्न करायचे, हे भाजपने ठरवलेले दिसते. भाजपला कल मिळाला तर कर्नाटकात आणखी जोमाने प्रयत्न होतील. तोपर्यंत काँग्रेसला अंतर्गत संघर्ष रोखावा लागणार आहे. अन्यथा, कर्नाटकाचाही ‘महाराष्ट्र’ होऊ शकतो.

2011 पासूनच ऑपरेशन कमळ राबवून विरोधी पक्षातील आमदारांना फोडणार्‍या भाजपने काँग्रेसमधल्या अंतर्गत संघर्षाला खतपाणी घालणे सुरु केले आहे. कसेही करून किमान 40 आमदार फोडण्याचे प्रयत्न भाजप करतो आहे, हे लपून राहिलेले नाही. माजी मुख्यमंत्री येडियुराप्पांसह सारेच नेते सरकारच्या पतनाची भाषा करतात, तेव्हा सरकार पाडण्याचे प्रयत्न कसून सुरू आहेत, याची जाणीव होते. या प्रयत्नांना जोड मिळालेय ती लोकसभेसाठी भाजप आणि निजदच्या झालेल्या युतीची.

-गोपाळ गावडा 

Back to top button