‘आता 2,000 रुपयांच्या नोटा पोस्टाने RBI कार्यालयात पाठवता येणार’ | पुढारी

'आता 2,000 रुपयांच्या नोटा पोस्टाने RBI कार्यालयात पाठवता येणार'

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : 2,000 रुपयांच्या नोटा (2000 notes) आता पोस्टद्वारे रिझर्व्ह बँकेच्या विशिष्ट प्रादेशिक कार्यालयांना पाठवता येणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया( RBI) लोकांना त्यांच्या बँक खात्यात रु. 2,000 च्या नोटा जमा करण्यासाठी TLR (ट्रिपल लॉक रिसेप्टॅकल) फॉर्मही देणार असल्‍याचे वृत्त ‘पीटीआय’ने दिले आहे.

यासंदर्भात माहिती देताना ‘आरबीआय’चे प्रादेशिक संचालक रोहित पी दास यांनी सांगितले की, आम्ही ग्राहकांना 2,000 रुपयांच्या नोटा विमा उतरवलेल्या पोस्टद्वारे RBI कडे त्यांच्या खात्यात थेट जमा करण्यासाठी सर्वात सुरक्षित पद्धतीने पाठवण्यास प्रोत्साहित करतो. आता ग्राहकांना दोन हजार रुपयांची नोट बदलण्‍यासाठी बँकांच्‍या विशिष्ट शाखांमध्ये जाण्‍याची तसेच रांगेत उभे राहण्‍याची गरज भासणार नाही.

19 मे रोजी आरबीआयने 2,000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून घेण्याची घोषणा केली होती. 19 मे 2023 पर्यंत चलनात असलेल्या 2,000 रुपयांच्या नोटांपैकी 97 टक्क्यांहून अधिक नोटा परत आल्या आहेत. दोन हजार रुपयांच्‍या नोटा असलेल्‍या सार्वजनिक आणि संस्थांना सुरुवातीला 30 सप्टेंबरपर्यंत त्या बदलून किंवा बँक खात्यात जमा करण्यास सांगण्यात आले होते. ही अंतिम मुदत ७ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली होती.

बँक शाखांतील दोन्ही ठेव आणि विनिमय सेवा ७ ऑक्टोबरपासून बंद करण्यात आल्या होत्या. 8 ऑक्टोबरपासून दाेन हजार रुपयांची नाेट रिझर्व्ह बँकेच्या 19 कार्यालयांमध्ये समतुल्य रक्कम जमा करण्याचा पर्याय प्रदान करण्यात आला हाेता. बँक नोटा जमा किंवा बदली करण्‍यासाठी 19 आरबीआयच्‍या अहमदाबाद, बंगलोर, बेलापूर, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पाटणा आणि तिरुअनंतपुरम येथे कार्यालये आहेत.1000 आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये 2,000 रुपयांच्या नोटा चलनात आल्या होत्या.

Back to top button