Stock Market Crash | सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे १५ मिनिटांत उडाले ३.५८ लाख कोटी | पुढारी

Stock Market Crash | सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे १५ मिनिटांत उडाले ३.५८ लाख कोटी

पुढारी ऑनलाईन : जागतिक कमकुवत संकेतांमुळे आज गुरुवारी (दि.२६) शेअर बाजार सलग सहाव्या सत्रांत कोसळला. यूएस ट्रेझरी उत्पन्न आणि मध्य पू‍र्वेतील संघर्ष हे घटक बाजारातील घसरणीला प्रमुख कारण ठरले आहेत. आज सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स ६०० अंकांनी अधिक कोसळून ६३,४१६ वर आला. तर निफ्टी सुमारे १९० अंकांनी घसरून १९ हजारांच्या खाली आला. या सुरुवातीच्या घसरणीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३.५८ लाख कोटींनी कमी होऊन ते ३०५.६४ लाख कोटींवर आले.

संबंधित बातम्या

सेन्सेक्सवर एम अँड एम, टेक महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, जेएसडब्ल्यू स्टील हे सुमारे २ ते २.४३ टक्क्यांपर्यंत घसरले. टाटा मोटर्स, टाटा स्टील, एनटीपीसी, विप्रो, सन फार्मा, नेस्ले इंडिया, एसबीआय, एचडीएफसी बँक, टायटन, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक बँक, मारुती, एलटी हे शेअर्स १ ते १ टक्क्यांहून अधिक घसरले. केवळ ॲक्सिस बँकेचा शेअर १ टक्के वाढून तेजीत आहे.

आशियाई बाजारात घसरण

कमाईबाबत निराशाजनक कामगिरीनंतर अल्फाबेटचे शेअर्स घसरले. तसेच यूएस ट्रेझरीचे उत्पन्न वाढले आहे. यामुळे फेडरल रिझर्व्हच्या व्याजदरवाढीची पुन्हा चिंता ‍‍‍व्यक्त केली जात आहे. परिणामी बुधवारी अमेरिकेतील बाजारात घसरण झाली होती. अमेरिकेतील बाजाराचा मागोवा घेत आशियाई बाजारातील निर्देशांक आज कोसळले. चीनचा ब्लू-चिप निर्देशांक ०.५१ टक्क्यांनी घसरला. तर जपानचा निक्केई निर्देशांक सुमारे २ टक्क्यांनी खाली आला होता.

Back to top button