कमोडिटी मार्केट म्हणजे काय? जाणून घ्या ट्रेडिंगची पद्धत | पुढारी

कमोडिटी मार्केट म्हणजे काय? जाणून घ्या ट्रेडिंगची पद्धत

अर्थपंडित

इक्विटी मार्केटप्रमाणेच करन्सी मार्केट आणि कमोडिटी मार्केट यांचीही गेल्या काही वर्षांत ट्रेडर्समध्ये लोकप्रियता वाढत आहे. इक्विटी मार्केटमध्ये सार्वजनिकरीत्या सूचीबद्ध कंपन्यांच्या समभागांची खरेदी-विक्री केली जाते. कमोडिटी मार्केटमध्ये कच्चा माल किंवा प्राथमिक उत्पादने यांची खरेदी-विक्री केली जाते.

कमोडिटीजचे हार्ड आणि सॉफ्ट कमोडिटी असे दोन प्रमुख प्रकार आहेत. कमोडिटी मार्केट ही एक अशी बाजारपेठ आहे जिथे ट्रेडर्स मसाले, सोने-चांदीसारखे मौल्यवान धातू, कच्चे तेल यासारख्या अनेक वस्तूंची खरेदी-विक्री करू शकतात.

कमोडिटीज स्पॉट मार्केट किंवा एक्स्चेंजवर ट्रेड केले जातात. सर्वात जास्त ट्रेड होणार्‍या कमोडिटीमध्ये सोने, चांदी, कच्चे तेल (क्रूड), ब्रेंट ऑईल, नैसर्गिक गॅस, सोयाबीन, कॉटन, गहू, मका आणि कॉफी यांचा समावेश होतो. भारतामध्ये सुमारे 20 पेक्षा जास्त वस्तूंमध्ये ट्रेडिंग करण्याची परवानगी देण्यात आली आहे; मात्र देशात प्रामुख्याने सोने, चांदी, क्रूड, हळद, ब्रास, अ‍ॅल्युमिनियम, लीड, कॉपर, झिंक, निकेल, नैसर्गिक गॅस आदींमध्ये मोठ्या प्रमाणात ट्रेडिंग होताना दिसते.

कमोडिटीच्या चार प्रमुख श्रेणी –

1) बुलियन – सोने आणि चांदी, 2) ऊर्जा – कच्चे तेल आणि नैसर्गिक वायू, 3) कृषी – काळी मिरी, वेलची, एरंडेल, कापूस, पामतेल, कापस, गहू, धान, चना, बाजरी, बार्ली आणि साखर इतर, 3) बेसमेटल्स – तांबे, शिसे, अ‍ॅल्युमिनियम, निकेल आणि जस्त

हार्ड कमोडिटीज : हार्ड कमोडिटीमध्ये नैसर्गिक संसाधनाचा समावेश होतो. ज्यांचे प्रामुख्याने उत्खनन केले जाते. हार्ड कमोडिटीचे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे. 1) धातू – सोने, चांदी, जस्त, तांबे, प्लॅटिनम 2) ऊर्जा – नैसर्गिक वायू, कच्चे तेल, पेट्रोल

सॉफ्ट कमोडिटीज : सॉफ्ट कमोडिटीजमध्ये अशा वस्तूंचा समावेश होतो, ज्या प्रामुख्याने पिकवल्या जातात. सॉफ्ट कमोडिटीचे दोन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले आहे: 1) कृषी – तांदूळ, मका, गहू, कापूस, सोयाबीन, कॉफी, मीठ, साखर 2) पशुधन आणि मांस : गुरे, अंडी

मल्टिकमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडियावर (MCX) ट्रेड होणार्‍या कमोडिटी

1) कृषी : ब्लॅक पेपर, कॅस्टर सीड, क्रूड, पाम ऑईल, इलायची, कॉटन, मेंथा ऑईल, रबर, पामोलिन 2) ऊर्जा : नैसर्गिक गॅस, कच्चे तेल (क्रूड) 3) बेसमेटल्स : अ‍ॅल्युमिनियम, लीड, कॉपर, झिंक, निकेल 4) बुलियन : सोने, चांदी.

राष्ट्रीय कमोडिटी आणि डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंजवर (NCDEX) ट्रेड होणार्‍या कमोडिटी

1) मका, बार्ले, गहू, चना, मूग, बासमती, साखर, कॉटन, गारसीड, गुआर गम 2) मसाले : मिरची, जीरा, हळद, धनिया 3) तेल आणि तेल बिया : कॅस्टर बीज, सोयाबीन, सरस बीज, कॉटन सीड ऑईल केक, रिफाईन्ड सोया ऑईल, क्रूड, पाम ऑईल.

भारतातील कमोडिटी ट्रेडिंगची पद्धत –

कमोडिटीच्या ट्रेडिंगसाठी नियम आणि प्रक्रिया ठरवणारी, नियंत्रित करणारी आणि त्यांची अंमलबजावणी करणारी कायदेशीर संस्था म्हणजे कमोडिटी एक्सचेंज. भारतात, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या (सेबी) अधिपत्याखाली 20 पेक्षा जास्त एक्स्चेंजेस कार्यरत आहेत. त्यापैकी कोणत्याही एक्स्चेंजवर जाऊन कमोडिटी ट्रेडिंग करता येते. 2015 पर्यंत फॉरवर्ड मार्केट कमिशनद्वारे नियंत्रित केले जात होते; मात्र ट्रेडिंगमध्ये एकसंघ नियामक वातावरण तयार करण्यासाठी सेबीमध्ये विलीन करण्यात आले.

कमोडिटी ट्रेडिंगसाठी कशाची आवश्यकता आहे?

तुम्हाला डिमॅट अकाऊंट, ट्रेडिंग अकाऊंट आणि बँक अकाऊंटची आवश्यकता असेल. डिमॅट अकाऊंट तुमचे सर्व ट्रेडस् आणि होल्डिंग्सचे किपर म्हणून कार्य करेल; परंतु एक्स्चेंजवर ऑर्डर देण्यासाठी तुम्हाला ब्रोकर निवडावा लागेल.

भारतात सहा प्रमुख कमोडिटी ट्रेडिंग एक्स्चेंज –

नॅशनल मल्टिकमोडिटी एक्स्चेंज इंडिया (NMCE), नॅशनल कमोडिटी अँड डेरिव्हेटिव्ह एक्स्चेंज (NCDEX), मल्टिकमोडिटी एक्स्चेंज ऑफ इंडिया (MCX), इंडियन कमोडिटी एक्स्चेंज (ICEX), नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE), बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE). (क्रमश:)

Back to top button