China vs India : पँगाँग मध्ये पुन्हा चिनी चौक्या | पुढारी

China vs India : पँगाँग मध्ये पुन्हा चिनी चौक्या

जम्मू ; अनिल साक्षी : पूर्व लडाखमधील वादग्रस्त भागासंबंधी दोन्ही देशांदरम्यान वारंवार चर्चा आणि बैठका होत असताना ‘ड्रॅगन’ला पुन्हा खुमखुमी आल्याचे दिसत आहे. पँगाँग सरोवराच्या ब्लॅक टॉप परिसरात पुन्हा तळ उभारल्याचा दावा चीनने केला आहे. या ठिकाणी चिनी सैन्याने चौक्या उभारल्या (China vs India) असल्याचे दावे चिनी माध्यमांनी केले आहेत.

आता केवळ चौक्या उभारण्यात आल्या आहेत. भविष्यात चिनी सैन्याच्या येथील कवायती भारतीय सैन्यासाठी डोकेदुखी ठरेल, अशा वल्गनाही चिनी माध्यमे करीत आहेत. ट्विटर आणि इतर चिनी माध्यमांतून कैलाश रेंजच्या पहाडी प्रदेशात चिनी सैन्यांनी पुन्हा चौक्या उभारल्या आहेत. यासंबंधीची छायाचित्रेही चिनी माध्यमांनी प्रसृत केली आहेत.

गेल्यावर्षीच्या ऑगस्टमध्ये भारतीय सैन्याने तातडीने वेगवान हालचाली करीत याच परिसरातून चिनी सैनिकांना मागे रेटले होते. एक मात्र खरे की, नव्याने उभारलेल्या चौक्यांमुळे चुशूल परिसरातील भारतीय सीमा चौक्यांवर टेहळणी करता येणे चिनी सेनेला शक्य होत आहे. (China vs India)

चिनी माध्यमांनी केलेल्या दाव्याबाबत भारतीय लष्करी अधिकार्‍यांनी अधिकृत वक्‍तव्य जारी केलेले नाही. संरक्षण विभागाच्या सूत्रांनी मात्र गेल्या काही महिन्यांपासून चिनी सैन्यांच्या हालचाली येथे वाढल्याचे म्हटले होते. तसेच ते आक्रमक मूडमध्ये असल्याचे निरीक्षण नोंदवत याबाबत चिंताही व्यक्‍त केली होती. दुसरीकडे, कोणत्याही परिस्थितीत चीनशी मुकाबला करण्यात भारतीय सैन्य सज्ज असल्याचे भारतीय लष्कराच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले होते.

…त्यामुळेच वाढली डोकेदुखी (China vs India)

कैलाश रेंजच्या हेल्मेट टॉप, मगर हिल आणि सेनापोशानच्या पर्वतीय प्रदेशात चौक्या उभारण्याचा प्रयत्न चीनकडून सुरू असल्याचे चिनी माध्यमांनी आधीही म्हटले होते. येथून भारतीय सैन्याची थेट टेहळणी करता येते. वादग्रस्त भागासंबंधी दोन्ही देशांदरम्यान राजनैतिक आणि कमांडर स्तरावरील चर्चेच्या फेर्‍या होत असल्या, तरी चिन्यांकडून या परिसरात कधीही विश्‍वासघात होऊ शकतो. त्यामुळेच भारताची डोकेदुखी वाढली आहे.

Back to top button