Gaganyaan MissionTest Flight | इस्रोच्या ‘गगनयान’ वाहन चाचणीचे प्रक्षेपण थांबवले, नेमकं काय झालं? | पुढारी

Gaganyaan MissionTest Flight | इस्रोच्या 'गगनयान' वाहन चाचणीचे प्रक्षेपण थांबवले, नेमकं काय झालं?

पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्रोकडून (ISRO) गगनयान मोहिमेच्या पहिल्या वाहन चाचणी अंतराळयानाचे आज (दि.२१) सकाळी ८.४० च्या दरम्यान प्रक्षेपण करण्यात येणार होते. पण काही तांत्रिक अडचणीमुळे हे चाचणी प्रक्षेपण थांबवण्यात आल्याची माहिती इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांनी दिली. दरम्यान, गगनयानच्या TV-D1 लाँच दरम्यानची तांत्रिक अडचण दूरुस्त करण्यात आली आहे. आता सकाळी १० वाजता प्रक्षेपण नियोजित करण्यात येणार असल्याचे इस्रोकडून सांगण्यात आले आहे.

अंतराळवीरांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ही चाचणी घेण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर (SDSC) येथून गगन चाचणी यानाच्या प्रक्षेपण करण्यासाठी इस्रोची सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली होती. पण प्रक्षेपणाच्या अंतिम टप्प्यात म्हणजेच केवळ ५ सेकंद बाकी असताना ते थांबवण्यात आले. (Gaganyaan MissionTest Flight)

इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी निवेदन जारी करत सांगितले की, ॲबॉर्ट मिशन-१ साठी (Abort Mission-1)  लिफ्ट ऑफ आज होऊ शकले नाही. नियोजित वेळेत इंजिन प्रज्वलित झाले नाही, नेमके काय झाले हे शोधावे लागेल. प्रक्षेपण वाहन सुरक्षित आहे, आम्हाला काय झाले ते पाहण्याची गरज आहे. आम्ही लवकरच चाचणी प्रक्षेपण करु. संगणकाने लाँच थांबवले आहे. आम्ही ज्या काही अडचणी आहेत त्या दुरुस्त करू आणि लवकरच लाँचिंग वेळ निश्चित करू.”

गगनयानच्या माध्यमातून कमी कालावधीत पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (LEO- Lower Earth Orbit) HSFC केंद्र उभारण्याचा प्रयोग केला जाणार आहेत. भविष्यातील अंतराळ मोहिम प्रक्षेपण, उड्डाण आणि प्रात्यक्षिकासाठी भारताने गगनयान मोहिमेची बांधणी केली आहे. पृथ्वीच्या खालच्या कक्षेत (LEO) मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेला प्रक्षेपित करण्याची स्वदेशी क्षमता प्रदर्शित करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेच्या यशामुळे अंतराळात स्पेस स्टेशन उभारणीच्या दृष्टीने भारत आणखी एक पाऊल पुढे टाकणार आहे. भारताच्या गगनयान मोहिमेचा यशस्वी प्रयोग म्हणजे भारताच्या दीर्घकाळ शाश्वत अंतराळ संशोधन कार्यक्रमाचा पाया रचला जाणार असल्याचे इस्रोने त्यांच्याअधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.(Gaganyaan MissionTest Flight)

संबंधित बातम्या:

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने पुढे म्हटले आहे की, ‘ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर’ ही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेद्वारे अंतराळात उभारण्यात येणारे अंतराळ केंद्र आहे. या सेंटरमधून भविष्यातील भारतीय मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या केंद्रावर इस्रोची केंद्रे आणि संशोधन प्रयोगशाळा याद्वारे नियंत्रण ठेवले जाणार आहे. HSFC हे ह्युमन स्पेस सेंटर ही यंत्रणा भारतीय शैक्षणिक आणि उद्योगांमध्ये मिशन पूर्ण करण्यासाठीच्या कृतींवर लक्ष केंदित करते. HSFC हे (ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर) भविष्यातील अंतराळ प्रशिक्षणांचे उड्डाण आणि क्रियाकलापांचे प्रमुख केंद्र असणार आहे. (Gaganyaan MissionTest Flight launched)

पृथ्वीच्या कक्षेतील HSFC हे क्षेत्रे भविष्यातील शाश्वत मानवी अंतराळ उड्डाण क्रियाकलाप जसे की, भेट आणि डॉकिंग, स्पेस स्टेशन बिल्डिंग आणि चंद्र/मंगळ आणि जवळ-पृथ्वीवरील लघुग्रहांवर आंतरग्रहीय सहयोगी मानव मोहिमांसाठी महत्त्वपूर्ण घटक बनतील, असे देखील इस्रोन दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

TV-D1 Test Flight : मानवी अंतराळ उड्डाणापूर्वी चाचणी

मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेपूर्वी विविध प्रात्यक्षिक तंत्रज्ञान तयारी पातळीचे प्रात्यक्षिक करण्यासाठी विविध पूर्ववर्ती मोहिमा आखल्या जातात. या प्रात्यक्षिक मोहिमांमध्ये इंटिग्रेटेड एअर ड्रॉप टेस्ट (IADT), पॅड ॲबॉर्ट टेस्ट (PAT) आणि टेस्ट व्हेईकल (TV) फ्लाइटचा समावेश आहे. सर्व यंत्रणांची सुरक्षा आणि विश्वासार्हता मानवरहित मोहिमेपूर्वी मानवरहित मोहिमांमध्ये सिद्ध केली जाते. अशाच प्रकारे गगनयान मोहिमेचे प्रात्यक्षिक प्रक्षेपण २१ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले आहे. हा गगनयान मोहिमेपूर्वीची रंगीत तालिम असणार आहे. गगनयानाचे हे प्रक्षेपण मानवरित असणार असल्याचे देखील इस्रोने म्हटले आहे.

 गगनयान मोहीम काय आहे?

गगनयान मोहिम तीन दिवसांसाठी असणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातून ३ क्रू सदस्यांना ४०० किमी पृथ्वीच्या कक्षेत उतरवले जाणार आहे. त्यानंतर त्यांना भारतीय समुद्रात उतरवून, सुरक्षितपणे पृथ्वीवर आणले जाणार आहे. या मोहिमेच्या माध्यमातीन मानवी अंतराळ उड्डाण क्षमतेचे प्रात्यक्षिक केले जाणार असल्याचे इस्रोने म्हटले आहे. आतरराष्ट्रीय एजन्सीकडे उपलब्ध असलेले तंत्रज्ञान, कौशल्य, भारतीय उद्योगांचा अनुभव भारतीय शैक्षणिक आणि संशोधन संस्‍थांच्‍या बौद्धिक क्षमतांचा विचार करून धोरणाद्वारे हा प्रकल्प पूर्ण केला असल्याचे इस्रोने म्हटले आहे. या मोहिमेत अंतराळात पाठवण्यात येणाऱ्या क्रू सदस्याच्या सुरक्षतेच्या पार्श्वभूमीवर रचना करण्यात आल्या आहेत. क्रूला अंतराळात सुरक्षितपणे घेऊन जाण्यासाठी मानवी रेट केलेले प्रक्षेपण वाहन,अंतराळात क्रूला पृथ्वीसारखे वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी लाइफ सपोर्ट सिस्टीम, क्रू इमर्जन्सी एस्केप तरतूद आणि प्रशिक्षणासाठी क्रू मॅनेजमेंटचा विकास या बाबींचा समावेश आहे. तसेच या मोहिमेत क्रूची पुनर्प्राप्ती आणि पुनर्वसन यावर विशेष भर देण्यात आला आहे.

गगनयान मोहिमेचे महत्त्व

देशामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा स्तर वाढवणे आणि युवा मार्गदर्शकांना मदत करणे. गगनयान मिशनमध्ये विविध एजेन्सी, वापर, उद्योग आणि विभाग समाविष्ट केले जातील. ही मोहीम भारतातील औद्योगिक विकासात सुधारणा करण्यास मदत करते. या मोहिमेच्या माध्यमातून केंद्र सरकारकडून स्पेस क्षेत्रात खाजगी भागीदारी वाढवण्याच्या उद्देशाने प्रयत्न केले जाणार आहेत. दरम्यान भारताने IN-SPACe या खाजगी कंपनीला समाविष्ट करून घेण्याची घोषणा देखील या मोहिमेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. ही मोहिम सामाजिक लाभांसाठी तंत्रज्ञानाच्या विकासात मदत करेल. याचबरोबर भारताची गगनयान मोहीम ही क्षेत्र संशोधन,पाणी आणि ऊर्जा सुरक्षावर देखील लक्ष केंद्रित करेल असेही इस्रोने दिलेल्या प्रसिद्ध निवेदनात स्पष्ट केले आहे.

LVM3 - HLVM3Human rated LVM3 – HLVM3 रॉकेटचा वापर

LVM3 हे इस्रोचे विश्वासहार्य जड लिफ्ट लाँचर आहे. ‘चांद्रयान-3’साठी ‘एलव्हीएम-3’ अग्निबाणाचा वापर करण्यात आला होता. यामुळे गगनयान मोहिमेला बळ मिळाले. याच अग्निबाणाच्या साहाय्याने गगनयानाचे अवकाशात उड्डाण होणार आहे. ‘ह्युमन रेटेड एलव्हीएम-3’ असे गगनयानासाठी वापरल्या जाणार्‍या रॉकेटचे नामकरण करण्यात आले आहे. HLVM3 ऑर्बिटल मॉड्यूल 400 किमीच्या कमी पृथ्वीच्या कक्षेत प्रक्षेपित करण्यास सक्षम असेल, असे इस्रोने सांगितले आहे. HLVM3 मध्ये क्रु एस्केप सिस्टीम (CES) चा समावेश आहे. जे जलद कृती, उच्च बर्न रेट सॉलिड मोटर्सच्या संच या क्षमतेचे आहे. हे रॉकेट लाँच पॅडवर किंवा चढाईच्या टप्प्यात कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत क्रूसह क्रूमॉड्युल सुरक्षित अंतरावर नेण्यास मदत करते असे देखील इस्रोने म्हटले आहे.

First crew module for Gaganyaan test flight takes shape. (Image courtesy: ISRO)

क्रयू मॉड्यूल:

इस्रो’ला ‘गगनयान’ प्रोजेक्टसाठी सिम्युलेटेड क्रू मॉड्यूल स्ट्रक्चर असेंब्ली मिळाली आहे. ही पहिली स्वदेशी ‘एससीएम’ असून, ती ‘विक्रम साराभाई स्पेस सेंटर’ने विकसित केली आहे. तसेच ते मंजीरा मशीन बिल्डर्स प्रायव्हेटने तयार केले आहे. या मॉड्यूलचा वापर अनेक टेस्ट व्हेईकल मिशनसाठी केला जाईल. याअंतर्गत क्रू मॉड्यूलच्या अनेक उपप्रणालींच्या चाचणीसह क्रू एस्केप सिस्टमचे प्रमाणीकरण केले जाईल. तसेच क्रू एस्केप सिस्टम व इतर उपप्रणाली प्रमाणित करण्यासाठी टेस्ट रॉकेट मिशनमध्येही ‘एससीएम’चा वापर केला जाईल.क्रू मॉड्यूल हे एक प्रेशराईज्ड कॅप्सूल आहे. त्या माध्यमातून ‘गगनयान’ मोहिमेसाठी अंतराळपटूंना प्रशिक्षण दिले जाते. ‘इस्रो’ची चालू वर्षाच्या अखेरीस एक टेस्ट रॉकेट प्रक्षेपित करण्याची योजना आहे. सध्या ‘गगनयान’ मोहिमेसाठी चार भारतीय अंतराळवीरांचे प्रशिक्षण सुरू असल्याचे देखील इस्रोकडून यापूर्वी स्पष्ट करण्यात आले होते.

Orbital Moduleऑर्बिटल मॉड्यूल:

ऑर्बिटल मॉड्युल (OM) जे पृथ्वीची परिक्रमा करणार आहे त्यात क्रू मॉड्यूल (CM) आणि सर्व्हिस मॉड्यूल (SM) यांचा समावेश आहे. मानवी सुरक्षेचा विचार करून ऑर्बिटल मॉड्युलमध्ये (OM) पुरेशा तंत्रज्ञानासह त्याधुनिक एव्हियोनिक्स प्रणालीचा देखील समावेश करण्यात आला आहे. क्रू मॉड्यूलमध्ये (CM) क्रूसाठी पृथ्वीसारखे वातावरण असलेले राहण्यायोग्य जागा आहे. यामध्ये दुहेरी भिंतीचे बांधकाम आहे. ज्यामधील आतील भिंत ही दाबयुक्त धातूंची आहे तर बाहेरील भिंत थर्मल प्रोटेक्शन सिस्टमसह (TPS) दबाव नसलेली आहे. यात क्रू इंटरफेस, मानवी केंद्रीत उत्पादने, जीवन समर्थन प्रणाली, एव्हीओनिक्स आणि डिलेरेशन सुविधा आहेत. खाली उतरेपर्यंत होईपर्यंत खाली उतरताना क्रूची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ते पुन्हा प्रवेशासाठी देखील डिझाइन केले आहे.

गगनयानसाठी नवीन तंत्रज्ञान विकसित

गगनयान मोहिमेत मानवी सुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे सुनिश्चित करण्यासाठी, अभियांत्रिकी प्रणाली आणि मानवकेंद्रित प्रणालींचा समावेश असलेले विविध नवीन तंत्रज्ञान विकसित आणि साकार केले जात आहेत, असेही इस्रोने दिलेल्या माहितीत म्हटले आहे.

भारतासाठी अभिमानास्पद!

भारताने चांद्रयान-३ मोहिमेनंतर सूर्यमोहिम आदित्य- L1 मोहीम यशस्वी केली. जागतिक स्तरावर भारताचे हे अंतराळ क्षेत्रातील ऐतिहासिक अन् महत्त्वपूर्ण पाऊल होते. यानंतर भारत गगनयान मोहिमेच्या दिशेने आपली पावले वेगाने टाकत आहे. अमेरिका, रशिया, चीन आदी देशांनी मानवयुक्त यान अवकाशात पाठविले आहे. गगनयानाच्या यशानंतर मानवयुक्त यान पाठविणारा भारत हा जगातील चौथा देश ठरणार आहे. ‘चांद्रयान-3’च्या यशामुळे ‘इस्रो’मधील शास्त्रज्ञांचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी आता गगनयानावर लक्ष केंद्रित केले आहे ही भारताच्या दृष्टीने अभिमानास्पद गोष्ट आहे.

भारताच्या भविष्यातील अंतराळ योजना

भारताचे चांद्रयान-३, सूर्यमोहिमेच्या यशानंतर ‘गगनयान’ प्रक्षेपणाठी सज्ज आहे. या मोहिमेसंदर्भात आज पंतप्रधान कार्यालयात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भविष्यातील भारतीय अंतराळ मोहिमांचे वेळापत्रक जाहीर केले होते. आगामी वर्षात इस्रोच्या साहाय्याने भारत शुक्र आणि मंगळावरील मोहिमा हाती घेणार आहे. तर २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्थानक उभारणार असून, २०४० पर्यंत चंद्रावर मानव पाठवणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button