Stock Market Closing Bell | सलग तिसऱ्या दिवशी बाजार गडगडला, सेन्सेक्स ६५,४०० च्या खाली | पुढारी

Stock Market Closing Bell | सलग तिसऱ्या दिवशी बाजार गडगडला, सेन्सेक्स ६५,४०० च्या खाली

पुढारी ऑनलाईन : इस्रायल- हमास युद्धामुळे जागतिक बाजारातील कमकुवत स्थिती आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे आज शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण कायम राहिली. सेन्सेक्स आज २३१ अंकांनी घसरून ६५,३९७ वर बंद झाला. तर निफ्टी ८२ अंकांच्या घसरणीसह १९,५४२ वर स्थिरावला. काही कंपन्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी दुसऱ्या तिमाहीतील कमाईच्या आकड्यांमुळेही बाजाराचा मूड बिघडला आहे.

संबंधित बातम्या 

कॅपिटल गुड्स, मेटल, पॉवर, रियल्टी, ऑईल ॲड गॅस, एफएमसीजी आणि फार्मा हे क्षेत्रीय निर्देशांक ०.५ ते १ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप निर्देशांक १ टक्के आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.७ टक्क्यांनी घसरला. (Stock Market Closing Bell)

दरम्यान, भारतीय रुपया (Indian rupee) ८३.२४ च्या मागील बंदच्या तुलनेत आज १२ पैशांनी वाढून ८३.१२ प्रति डॉलरवर बंद झाला.

काल गुरुवारी सेन्सेक्स ६५,६२९ वर बंद झाला होता. आज शुक्रवारी तो ६५,४३६ वर खुला झाला. त्यानंतर तो ६५,३०० पर्यंत खाली आला. सेन्सेक्सवर आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा स्टील, जेएसड्ब्ल्यू स्टील हे शेअर्स २ टक्के ते त्याहून अधिक घसरले. एलटी, एसबीआय, पॉवर ग्रिड, ॲक्सिस बँक, बजाज फायनान्स, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, एम अँड एम, टाटा मोटर्स, एचसीएल टेक हे शेअर्सही घसरले. दरम्यान, कोटक बँक, इंडसइंड बँक, टीसीएस, एनटीपीसी, नेस्ले इंडिया, एचडीएफसी बँक हे शेअर्स वाढले.

निफ्टीवर आयटीसी, डिव्हिज लॅब, टाटा स्टील, हिंदुस्तान युनिलिव्हर, जेएसडब्ल्यू स्टील हे टॉप लूजर्स ठरले. तर कोटक बँक, इंडसइंड बँक, टीसीएस, एसबीआय लाईफ हे टॉप गेनर्स राहिले.

जागतिक बाजारात कमकुवत स्थिती

मध्य पूर्वेतील इस्रायल- हमास युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलिया, जपान, हाँगकाँग आणि दक्षिण कोरियातील शेअर बाजारात घसरण झाली आहे. काल गुरुवारी अमेरिकेतील बाजारात कमकुवत स्थिती दिसून आली होती. एस अँड पी निर्देशांक घसरला.

टेस्लाचे शेअर्स घसरले, मस्क यांना फटका

टेस्ला इंकच्या (Tesla Inc.) कमकुवत कमाईच्या आकडेवारीचा अमेरिकेतील बाजारात परिणाम झाला आहे. टेस्लाचे शेअर्स ९ टक्क्यांनी घसरले. या घसरणीनंतर गुरुवारी एलॉन मस्क (Elon Musk) यांच्या संपत्तीत १६.1 अब्ज डॉलरने घट झाली. मस्क हे २०९.६ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक आहेत त्याच्याकडे टेस्लाची १३ टक्के मालकी आहेत आणि त्यांनी बहुतांशी संपत्ती ऑटो कंपनीच्या माध्यमातून मिळवली आहे.

युरोपीय बाजारावरही दबाब

इस्रायल-हमास संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेतील गुंतवणुकीकडे वळल्याने आज युरोपीय शेअर बाजार घसरले. लंडनचा बेंचमार्क FTSE १०० निर्देशांक ०.५ टक्क्यांनी घसरून ७,४६३ अंकांवर आला. फ्रँकफर्टचा DAX निर्देशांक १.१ टक्क्यांनी घसरून १४,८७३ अंकांवर आणि पॅरिस CAC ४० निर्देशांक १.१ टक्क्यांनी घसरून ६,८४३ पर्यंत खाली आला.

हे ही वाचा :

Back to top button