October Festival : ऑक्टोबर महिन्यात व्रतवैकल्यांची रेलचेल | पुढारी

October Festival : ऑक्टोबर महिन्यात व्रतवैकल्यांची रेलचेल

पुढारी वृत्तसेवा : ऑक्टोबर महिना म्हटला की, सर्वात पहिले डोळ्यासमोर उभा राहतो तो नवरात्रोत्सव. त्यानंतर या महिन्याची सुरूवात झाली की वर्ष पटापट संपायला सुरूवात होते अशी सर्वांचीच भावना असते. नवरात्रीचा उत्सव हा दुर्गादेवीला समर्पित असतो. नऊ दिवसांमधील वातावरण हे भक्तीमय असते. ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच विविध परंपरा पहायला मिळतात. कारण या संपूर्ण महिन्यात विविध धार्मिक पूजा आणि व्रतवैकल्यांना फार महत्त्व असते.

पौराणिक मान्यतेनुसार, पितृपक्षातील एकादशीला विशेष महत्त्व असते. 14 ऑक्टोबरला सर्वपित्री अमावस्या आहे. सर्वपित्री अमावस्येला पितृ पक्षाचा शेवटचा दिवस म्हणतात. ज्या लोकांना आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या मृत्यूची तारीख आठवत नाही किंवा काही कारणास्तव श्राद्ध करता येत नाही, अशा लोकांना सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी तर्पण आणि पिंड दान देण्याची परंपरा आहे. यादिवशी पितृपंधरवड्याची समाप्ती होईल.

शारदीय नवरात्रोत्सवास 15 ऑक्टोबरपासून प्रारंभ होईल. दुर्गादेवीचा भक्तीचा हा उत्सव नऊ दिवस चालेल. 22 ऑक्टोबरला दुर्गाष्टमी असेल. 23 ऑक्टोबर रोजी महानवमी असून हा नवरात्रीचा शेवटचा दिवस आहे. यादिवशी सिद्धिदात्री देवीची पूजा आणि शस्त्रांची पूजा केली जाते. यासह हवन करून नऊ दिवसांची पूजा पूर्ण होते. 24 ऑक्टोबर रोजी विजयादशमी म्हणजे दसरा आहे. या दिवशी दुर्गादेवीच्या मूर्तीचे विसर्जन होते. दसरा हा सण वाईटावर चांगल्याचे प्रतीक आहे. या दिवशी रावण दहन करण्यात येते. 25 ऑक्टोबरला पापंकुशा एकादशी असून यादिवशी तीर्थक्षेत्र पंढरीत मोठी श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते.

आश्विन पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा 28 ऑक्टोबरला आहे. आश्विन महिन्यातील या पौर्णिमेला शरद पौर्णिमा असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला. या रात्री अमृत पडते असे मानले जाते. शरद पौर्णिमेच्या रात्री दूध आटवून ते खुल्या आकाशात ठेवले जाते जेणेकरून त्याला अमृताचे गुणधर्म प्राप्त होतात, अशी धारणा आहे. 29 ऑक्टोबरपासून कार्तिक महिना सुरू होतो.

हेही वाचा

Back to top button