गणपतीच्या हातातील लाडूला मिळाली 27 लाखांची किंमत | पुढारी

गणपतीच्या हातातील लाडूला मिळाली 27 लाखांची किंमत

हैदराबाद : अनंत चतुर्दशीला देश-विदेशात गणपती बाप्पांना निरोप देण्यात आला. तेलंगणात एका गणपती मंदिरात दरवर्षी अनंत चतुर्दशीला बाप्पांच्या हातातील लाडूचा लिलाव केला जातो व त्याला मोठीच किंमत मिळत असते. यंदाही या भल्या मोठ्या लाडूचा लिलाव करण्यात आला असून त्याला तब्बल 27 लाख रुपयांची किंमत मिळाली आहे.

हैदराबादच्या बाळापूर गणेशाच्या लाडूचा असा दरवर्षी लिलाव होतो. हा लाडू भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक मानले जाते. यावर्षी हैदराबादमधीलच एका भाविकाने विक्रमी किमतीत हा लाडू खरेदी केला आहे. या लाडूला लिलावात तब्बल 27 लाख रुपयांची किंमत मिळाली. दासरी दयानंद रेड्डी नावाच्या गणेशभक्ताने हा लाडू लिलावात खरेदी केला. 2022 मध्ये एका भक्ताने अशा लाडूसाठी 24.60 लाख रुपये दिले होते, तर 2021 मध्ये या लाडूचा 18.90 लाख रुपयांमध्ये लिलाव झाला होता. यावर्षी ज्यांनी हा लाडू खरेदी केला, त्या दयानंद रेड्डी यांनी सांगितले की, गेल्यावर्षी मी लिलावात भाग घेतला होता, पण लाडू खरेदी करू शकलो नव्हतो. यावर्षी मात्र हा लाडू मिळाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे. या लाडूला ‘बंगारू लाडू’ असेही म्हटले जाते. बाळापूर गणेश उत्सव समिती दरवर्षी या लाडूचा लिलाव करते. ही गणेश समिती 1994 पासून लाडूचा लिलाव करीत आली आहे. त्यावर्षी लाडूला 450 रुपये किंमत मिळाली होती हे विशेष! या लाडूमुळे भरभराट होते व समृद्धी येते असे तिकडे मानले जाते.

Back to top button