Janmashtami Special : भारतातील श्रीकृष्णाची अनोखी मंदिरे | पुढारी

Janmashtami Special : भारतातील श्रीकृष्णाची अनोखी मंदिरे

पुढारी ऑनलाइन डेस्क : Janmashtami Special : भगवान श्रीकृष्णाचा जन्म भारतीय कालगणनेनुसार भाद्रपद महिन्यातील अष्टमीच्या मध्यरात्री झाला आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्मसोहळा जन्माष्टमी उत्सवाने साजरा केला जातो. ठिकठिकाणी दहीहंडीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तसेच श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्याने जन्माष्टमीनिमित्त मध्यरात्री श्रीकृष्णाच्या बालस्वरुपात विशेष पूजा केली जाते. जन्माष्टमी पर्वामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. या काळात अनेक कृष्ण भक्त या काळात श्रीकृष्ण मंदिरांची तीर्थयात्रा करतात. तुम्हाला श्रीकृष्ण मंदिरांची यात्रा करायची असेल तर या अनोख्या श्रीकृष्ण मंदिरांना तुम्हला भेट द्यायलाच हवी..

Janmashtami Special : श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर – ShriKrishna Janmabhumi Temple

भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत कंसाच्या कारागृहात मध्यरात्री झाला होता. या ठिकाणी श्रीकृष्णाचे भव्य मंदिर आहे. मात्र, सुलतानी आणि मुघलांच्या आक्रमण काळात मंदिरावर आक्रमण करण्यात आले. तसेच औरंगजेबच्या आक्रमण काळात येथील निम्म्या भागावर मशिद बांधण्यात आली आहे. मात्र त्याचा वाद सध्या न्यायालयात आहे. हे श्रीकृष्णाचे अतिशय सुंदर मंदिर आहे.

ShriKrishna Janmabhumi, Mathura Temple
ShriKrishna Janmabhumi, Mathura Temple

Janmashtami Special : बरसानाचे राधा-कृष्ण मंदिर – Barsana Radharani Temple

समस्त गोकूळ-मथुरा-वृंदावन राधा-कृष्णाच्या रासलीलांनी भरलेले आणि भारलेले आहे. मथुरा-गोकूळ-वृंदावनात श्रीकृष्णाची अनेक मंदिरे आहेत. मात्र, राधा राणीचे गाव बरसाना येथील राधा कृष्णाचे मंदिर खूपच सूंदर आणि वैशिष्ट्य पूर्ण आहे. येथे राधा-कृष्णाची सुबक मूर्ती आहे. याचे निर्माण राजा वीर सिंह याने 1675 मध्ये केले होते. ते उंच पहाडीवर आहे.

RadhaRani Temple, Barsana
RadhaRani Temple, Barsana

Janmashtami Special : द्वारकाधीश मंदिर, गुजरात – Dwarkadhish Temple, Gujrat

भगवान श्रीकृष्णांनी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर द्वारकानगरी वसवली होती. श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर द्वारका पाण्यात बुडाली. वर्तमानात त्याच काठावर द्वारका जिल्हा आहे. येथे भगवान श्रीकृष्णाचे भव्य मंदिर आहे. जे द्वारकाधीश मंदिर नावाने ओळखले जाते. हे चार धाम यात्रेतील मुख्य मंदिर आहे. असे मानले जाते की सर्वप्रथम श्रीकृष्णाच्या परपौत्राने येथे मंदिर बांधले होते. मात्र, नंतर वेळोवेळी याचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे.

Janmashtami Special :Dwarkadhish Temple, Gujrat
Janmashtami Special :Dwarkadhish Temple, Gujrat
Janmashtami Special : रणछोडराय मंदिर, डाकोर, गुजरात – Ranchodray Temple, Dakor, Gujrat

रणछोडराय हे भगवान श्रीकृष्णाचे एक नाव आहे. गुजरातच्या डाकोरमध्ये गोमती तलावाच्या काठी गडाच्या तटबंधीने वेढलेले हे मुख्यमंदिर आहे. गुजरातमध्ये असले तरी हे मंदिर महाराष्ट्रीयन शैलीत बांधण्यात आले आहे. असे मानले जाते की पेशव्यांच्या दरबारातील गोपाळ जगन्नाथ आंबेकर यांना एक विस्तीर्ण भव्य मंदिर साकारण्याचे स्वप्न पडले. त्यानंतर त्यांनी 1772 मध्ये हे मंदिर बांधले.
मंदिरातील मुख्य रणछोडराय मूर्ती काळ्या टचस्टोनमध्ये आहे, 1 मीटर उंच आणि 45 सेमी रुंदीची, सोने, दागिने आणि महागड्या कपड्यांनी सजलेली आहे. त्याचे सिंहासन, चांदी आणि सोन्याने मढवलेले लाकूडकामाचा एक अलंकृत उत्कृष्ट नमुना, बडोद्याच्या गायकवाड यांनी सादर केला होता.

Ranchodray Temple, Dakora, Gujrat
Ranchodray Temple, Dakora, Gujrat
Janmashtami Special : श्रीनाथ मंदिर, नाथद्वार राजस्थान – Srinath Temple Nath dwar Rajasthan

ना शिखर ना कुठली स्थापत्य शैली, भव्यता मात्र मोठी असलेले राजस्थानचे श्रीनाथजीचे भगवान श्रीकृष्णाला समर्पित मंदिर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मंदिरामुळे येथे नाथ नगरी वसली. हे मंदिर वल्लभ संप्रदायातील लोकांनी बांधले आहे. वल्लभ संप्रदायातील लोक आपल्या मंदिराला श्रीकृष्णाचे वडील नंदराय यांचे घर मानतात. त्यामुळे या मंदिराल कोणतेही शिखर नाही. तसेच कोणतीही मोठी स्थापत्य शैली नाही. मात्र हे मंदिर खूप मोठे आहे. तसेच मंदिराच्या प्रसिद्ध इतिहासामुळे खूप खास आहे.

श्रीनाथजींच्या मंदिरातील मुख्य मूर्ती पूर्वी गोकुळातील भगवान श्रीकृष्णाच्या मंदिरात होती. मात्र, औरंगजेबाने आक्रमण करून तेथील मंदिर उध्वस्त केले तेव्हा वल्लभ गोस्वामी हे तेथून श्रीकृष्णाची मूर्ती घेऊन निघाले. त्यांनी राजस्थानचे महाराणा राजसिंह यांच्या आश्रयाने श्रीनाथ मंदिरात मूर्तीची स्थापना केली. या मंदिरात भगवान श्रीकृष्णाच्या 7 वर्षातील बाल स्वरुपाची पूजा केली जाते.

उदयपूरचे महाराणा राजसिंह यांनी मंदिरासाठी एक लाख सैनिक सेवेत ठेवले तसेच या आश्रयामुळे येथे हळूहळू नाथ नगरी वसली. असे म्हटले जाते की तिरुपतीच्या मंदिरानंतर श्रीनाथ मंदिराला देशातील सगळ्यात धनी मंदिर मानले जाते.

ShreeNathji Temple, Rajasthan
ShreeNathji Temple, Rajasthan

Janmashtami Special : खाटू श्याम मंदिर, राजस्थान – Khatu Shyam Temple, Rajasthan

हे मंदिर भगवान श्रीकृष्णाल समर्पित आहे. हे मंदिर खूपच अनोखे आहे. कारण या मंदिरात श्रीकृष्णाचे आशीर्वाद प्राप्त असलेल्या बार्बरिक याच्या मस्तकाची पूजा केली जाते. यामागे मोठी पौराणिक आख्यायिका आहे. भीमाचा नातू आणि घटोत्कचचा मुलगा बार्बरिकला मिळालेली शक्ती मात्र त्याने केलेल्या विशिष्ट प्रतिज्ञेमुळे महाभारतातील दोन्ही ही पक्षांचा विनाश झाला असता.

त्यामुळे भगवान श्रीकृष्णाने बार्बरिकचे मस्तक मागितले. जे बार्बरिकने स्वखूशीने दिले. त्याच्या या त्यागाने प्रसन्न होऊन भगवान श्रीकृष्णाने त्याला वरदान आणि आशीर्वाद दिले. महाभारत युद्धानंतर त्याचे शीश नदीत वाहण्यात आले. नंतर ते ज्या ठिकाणी मिळाले. त्यांनी त्या मस्तकाला जमीनीत पुरले.

असे मानले जाते की राजा रूपसिंह चौहानच्या काळात हे शीश गायीला अचनाक फुटलेल्या पान्ह्यामुळे सापडले. नंतर रुपसिंह यांना येथे मंदिर स्थापन करावे असे स्वप्न पडले. त्यानंतर त्यांनी खाटू श्याम नावाने हे मंदिर स्थापित करून तेथे शीष ठेवले.

Janmashtami Special : Shree Khatu Shyam Temple, Rajasthan
Janmashtami Special : Shree Khatu Shyam Temple, Rajasthan

Janmashtami Special : गुरुवायूर मंदिर, केरळ – Guruvayur Temple, Kerala

केरळमधील गुरुवायूर मंदिर हे भगवान श्रीकृष्णांना समर्पित दक्षिण भारतातील सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराला दक्षिणेची द्वारका असेही म्हटले जाते. या मंदिरात देखील भगवान श्रीकृष्णांच्या बाल स्वरुपातील पूजा केली जाते. असे सांगितले जाते की जेव्हा गुजरातची द्वारकेत जेव्हा पूर आला. तेव्हा श्रीकृष्णाची प्रतिमा त्या पूरात वाहू लागली होती. ते गुरू बृहस्पतींनी पाहिले त्यांनी प्रतिमेला पूरातून बाहेर काढले. ही प्रतिमा पुन्हा दुसऱ्या ठिकाणी स्थापित करण्यासाठी ते जागा शोधत होते. तेव्हा भगवान शिव आणि माता पार्वतीने त्यांना केरळमध्ये ही मूर्ती स्थापना करण्यास सांगितली. तेव्हा बृहस्पतींनी वायु देवाच्या मदतीने केरळ मध्ये श्रीकृष्णाची प्रतिमा स्थापित केली. त्यामुळेच या मंदिराला गुरुवायूर मंदिर म्हटले जाते.

Janmashtami Special : Guruvayur Temple, Kerala
Janmashtami Special : Guruvayur Temple, Kerala
Janmashtami Special : पार्थसारथी मंदिर त्रिपलीकेन, चेन्नई – Parthsarthi Temple, Trip liken, Chennai

चेन्नई शहरात पार्थसारथी मंदिर नावाचे भगवान कृष्णाचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर त्रिपलिकेनमध्ये आहे. या मंदिरात भगवान विष्णूच्या चार अवतारांची पूजा केली जाते, कृष्ण, राम, नरसिंह आणि भगवान वराह. मंदिराचा इतिहास शतकानुशतके जुना आहे आणि त्याची वास्तुकला अप्रतिम आहे.

Janmashtami Special : Parthsarthi Temple, Chennai
Janmashtami Special : Parthsarthi Temple, Chennai
Janmashtami Special : श्रीकृष्ण मठ मंदिर उडुपी, कर्नाटक – ShriKrishna Math, Temple, Udupi, Karnataka

दक्षिण भारतात श्री कृष्ण मठ आहे. कर्नाटकात श्रीकृष्णाचे प्रसिद्ध मंदिर आहे. कर्नाटकातील उडुपी येथील श्रीकृष्ण मठ मंदिरात खिडकीच्या नऊ छिद्रांतून भगवान कृष्णाची पूजा केली जाते. लाकूड आणि दगडांनी बनवलेल्या या मंदिराजवळ असलेल्या तलावाच्या पाण्यात मंदिराचे प्रतिबिंब दिसते. जन्माष्टमीच्या निमित्ताने येथे भव्य उत्सवाचे आयोजन केले जाते आणि आसपासच्या शहरातून लोक भेट देण्यासाठी आणि प्रार्थना करण्यासाठी येतात.

Janmashtami Special : Shri Krushna Math Temple, Udupi
Janmashtami Special : Shri Krushna Math Temple, Udupi

Janmashtami Special : जगन्नाथ पुरी, ओडिशा – Jagannatha Puri Temple – Odisha

भारतातील चार धामांपैकी एक ओडिशा राज्यातील पुरी येथे आहे. जगन्नाथ पुरी मंदिरात भगवान कृष्ण त्यांचा मोठा भाऊ बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत विराजमान आहेत. असे मानले जाते की द्वापर नंतर भगवान श्रीकृष्ण पुरीत राहू लागले. जगभरात प्रसिद्ध असलेल्या जगन्नाथ पुरी येथून दरवर्षी रथयात्रा काढली जाते.

Janmashtami Special : Jagannatha Puri Temple, Odisha
Janmashtami Special : Jagannatha Puri Temple, Odisha

हे ही वाचा :

Back to top button