Chandrayaan 3 Moon Landing | विश्वविक्रमादित्य! चांद्रयान-३चे सॉफ्ट लँडिंग, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत ठरला पहिला देश

Chandrayaan3
Chandrayaan3
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : अखेर भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेने आज इतिहास रचला. अखेर ४० दिवसांचा प्रवास करत चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरचे आज चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग झाले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारे भारताचे हे पहिले यान आहे. तसेच चंद्रावर पोहोचणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. चांद्रयान- ३ च्या लँडर मॉड्यूलचे चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग झाल्याची माहिती भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने दिली आहे. (Chandrayaan 3 Moon Landing)

बुधवारी सायंकाळी निर्धारित वेळेनुसार सहा वाजून चार मिनिटांनी भारताचे 'चांद्रयान' चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले.

१४ जुलै रोजी श्रीहरीकोटा येथून झेपावलेले चांद्रयान ४० दिवसांनी चंद्रावर उतरले. बंगळूरच्या 'इस्रो'च्या मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स अर्थात मुख्य नियंत्रण कक्षातून या सॉफ्ट लँडिंगची सारी सूत्रे हाताळण्यात आली.

चांद्रयान-२ मोहिमेत राहिलेल्या त्रुटी दूर करून ही मोहीम आखण्यात आल्याने यावेळी कोणत्याही परिस्थितीत चांद्रयान चंद्रावर उतरेल याची वैज्ञानिकांना खात्री होती. रशियाचे लुना हे चांद्रयान दोनच दिवसांपूर्वी कोसळल्याने भारताच्या मोहिमेवर आता सगळ्या जगाचे लक्ष लागले होते. इस्रोसोबतच नासा आणि युरोपियन अंतराळ संस्था या मोहिमेवर लक्ष ठेवून आहेत.

लँडिंगचा क्षण लाईव्ह

चांद्रयान लँडिंगचे थेट प्रेक्षपण झाले. इस्रोने बुधवारी सायंकाळी ५ वाजून २० मिनिटांनी आपल्या मिशन ऑपरेशन कॉम्प्लेक्स अर्थात मुख्य नियंत्रण कक्षातून थेट प्रक्षेपणास सुरुवात केली होती. इस्रोच्या यू ट्यूब चॅनल, इन्स्टाग्राम, एक्स खाते आणि फेसबुक पेजवरून ते सर्वांना पाहता येत आहे. इस्रोच्या वेबसाईटवरही क्षणाक्षणाची माहिती उपलब्ध करून दिली आहे. (Chandrayaan 3 Moon Landing)

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाण्याचा शोध घेण्यासोबतच तेथील भूगर्भातील हालचाली, खनिजांचा शोध आदी कामे विक्रम लँडरवरील रोव्हर करणार आहे. मानवाला हवी असलेली आणि ठाऊक नसलेलीही अशी खनिजे चंद्रावर मिळू शकतात, असा अभ्यासकांचा होरा आहे. तसेच ग्राऊंड झिरोवरून चंद्राची छायाचित्रे टिपली जाणार असून, त्यातून तेथील भौगोलिक रचनेबाबत माहिती हाती येणार आहे.

सॉफ्ट लँडिंग अधिक आव्हानात्मक

आज सायंकाळची ६ वाजून ४ मिनिटे… भारताच्या चांद्रयान-३ (Chandrayan 3) ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले आणि त्याचवेळी खर्‍या अर्थाने भारत विश्वविक्रमादित्य ठरला. पृथ्वीवरून चंद्र जितका सपाट दिसतो, तो तितका अजिबात नाही, ही वस्तुस्थिती आहे. चंद्राच्या भूभागावर मोठमोठाले खड्डे असून, त्यांना विवर असे संबोधले जाते. यातील काही विवर इतके प्रचंड मोठे आहेत की, त्या क्रेटरमध्येही आणखी बरेच क्रेटर सामावलेले आहेत आणि याचमुळे सॉफ्ट लँडिंग करणे आव्हानात्मक असते.

दक्षिण ध्रुव का आहे महत्त्वाचा?

चंद्रावरील दक्षिण ध्रुव सर्वात कठीण भूभागापैकी एक मानला जातो. येथे लँडिंग अजिबात सहजसोपे असत नाही आणि म्हणूनच इस्रोने यावेळी प्रत्येक पाऊल अतिशय जपून टाकले. चंद्रावर सॉफ्ट लँडिंग होण्यासाठी पिनपॉईंट नेव्हिगेशन गाईड, फ्लाईट डायनामिक्स, सपाट जागेची अचूक माहिती, योग्यवेळी थ्रस्टर कार्यान्वित होणे आणि योग्यवेळी त्याचा वेग कमी होणे अतिशय महत्त्वाचे असते. चंद्रावर कोणतेही यान उतरत असते, त्यावेळी ते एका अर्थाने पडत असते. (chandrayaan 3 landing)

आतापर्यंत चंद्रावर जे यान पाठवले गेले, ते उत्तर किंवा मध्य ध्रुवाच्या रोखाने होते. या भूभागातील जागा बर्‍यापैकी सपाट आहे आणि सूर्याचा प्रकाशही उत्तम असतो. दक्षिण ध्रुव मात्र चंद्रावरील अशी जागा आहे, जिथे सूर्यप्रकाश पोहोचू शकत नाही. याचबरोबर या भूभागात मोठमोठाले दगड, मोठे क्रेटर आहेत. येथील सिग्नलदेखील कमकुवत असतो. त्यामुळेच, येथे सॉफ्ट लँडिंग अधिक आव्हानात्मक, अधिक कठीण ठरते.

'चांद्रयान-३' मोहिमेतील घटनाक्रम…

६ जुलै : इस्रोने मिशन चांद्रयान-३ श्रीहरिकोटा येथून १४ जुलैला रवाना होईल असे जाहीर केले.
७ जुलै : सर्व इलेक्ट्रिकल चाचण्या यशस्वी.
११ जुलै : सर्व लाँचिंग प्रक्षेपणाची रिहर्सल घेण्यात आली.
१४ जुलै : एलव्हीएम 3 एम 4 चांद्रयान-3 मोहिमेवर रवाना.
१५ जुलै : कक्षा वाढवण्याचा पहिला टप्पा सर.
१७ जुलै : दुसर्‍या कक्षेत यशस्वी प्रवेश.
२५ जुलै : चांद्रयान-3 चौथ्या कक्षेत पोहोचले.
१ ऑगस्ट : यानाची चंद्राच्या कक्षेजवळ झेप.
५ ऑगस्ट : यानाचा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश
६ ऑगस्ट : कक्षेत पोहोचल्यानंतर हळूहळू खाली येण्यास सुरुवात.
१४ ऑगस्ट : चांद्रयान-3 चंद्राच्या भूपृष्ठानजीक पोहोचले.
१६ ऑगस्ट : चांद्रयानाचा पाचव्या व शेवटच्या कक्षेत प्रवेश.
१८ ऑगस्ट : डिबुस्टिंग ऑपरेशनची सांगता.
२३ ऑगस्ट : सारे काही नियोजनाप्रमाणे पार पडल्याने यानाने टचडाऊन केले!

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news