राहुल गांधींच्या ‘मोहब्बत की दुकान’मध्ये चिनी वस्तू; भाजपची टीका | पुढारी

राहुल गांधींच्या 'मोहब्बत की दुकान'मध्ये चिनी वस्तू; भाजपची टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क : खासदारकी बहाल झाल्यानंतर राहुल गांधी आज (दि.७) सकाळीच लोकसभेत पोहोचले. मात्र भाजपच्या निशिकांत दुबे आणि अन्य खासदारांनी काँग्रेस पक्ष चीनच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे सांगत हल्लाबोल केला. ‘न्यूजक्लीक’ नावाचे पोर्टल चीनी पैशावर चालले असून ते सरकारविरोधात काम करीत आहे. या मोहिमेत काँग्रेसही सामील असल्याचा आरोप दुबे यांनी केल्यानंतर सदनात एकच गदारोळ उडाला. दुसरीकडे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत राहुल गांधी यांच्या प्रेमाच्या दुकानात चीनी वस्तू विकल्या जात असल्याची टीका केली.

नेविल रॉय सिंघम आणि त्याचे न्यूज क्लीक नावाचे पोर्टल चीनी कम्युनिस्ट पक्षाचे धोकादायक शस्त्र असण्यावर न्यूयॉर्क टाईम्सने शिक्कामोर्तब केले असल्याचे सांगून ठाकूर पुढे म्हणाले की, काँग्रेसचे प्रेमाचे दुकान न्यूज क्लीकशी जोडले गेलेले आहे. गांधी यांच्या नकली प्रेमाच्या दुकानात चीनचे सामान आहे. हा देशविरोधी अजेंडा आम्ही चालवू देणार नाही. देशविरोधी आणि भारत तोडो च्या मोहिमेत काँग्रेस सामील असल्याचे स्पष्ट झालेले आहे. चीनी दुतावासाकडून राजीव गांधी फाउंडेशनला देणगी मिळाल्याचेही उघड झालेले आहे. संपुआने आपले नाव बदलले आहे. पण घमेंडी आघाडीच्या हातात देश सुरक्षित राहणार नाही, याची जनतेला जाणीव आहे, असा हल्लाबोल मंत्री अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर केला आहे.

हेही वाचा : 

Back to top button