Rahul Gandhi : राहुल गांधींची खासदारकी बहाल, काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष | पुढारी

Rahul Gandhi : राहुल गांधींची खासदारकी बहाल, काॅंग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष

पुढारी वृत्तसेवा, नवी दिल्ली : मोदी आडनावाची बदनामी केल्याच्या प्रकरणात झालेल्या दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याच्या पार्श्वभूमीवर लोकसभा सचिवालयाने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी बहाल केली आहे. काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करुन या निर्णयाचे स्वागत केले. खासदारकी बहाल केली जात असल्याबाबतची अधिसूचना लोकसभा सचिवालयाकडून सोमवारी सकाळी जारी करण्यात आली. (Rahul Gandhi)

Rahul Gandhi : राहुल गांधी यांची खासदारकी बहाल

सन 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांना केरळमधील वायनाड मतदारसंघातून विजय मिळवला होता. मात्र मोदी आडनावाची बदनामी केल्याच्या प्रकरणात सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरवित त्यांना दोष वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर ही खासदारकी रद्द झाली होती. गुजरात उच्च न्यायालयाने शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर सर्वोच्च न्यायालय हा एकमेव आधार गांधी यांच्यासमोर राहिला होता. अखेर गत आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना दिलासा दिला होता.

कर्नाटकमधील कोलार येथे 13 एप्रिल 2019 रोजी निवडणूक प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी यांनी मोदी आडनावाची बदनामी केल्याचा आरोप झाला होता. ‘निरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी या आडनावामध्ये कोणती समानता आहे?, सर्व चोरांचे आडनाव मोदी का असते?’ असे गांधी त्यावेळी म्हणाले होते. यावर गुजरातमधील भाजपचे आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात कलम 499 आणि 500 अंतर्गत अवमाननेचा खटला दाखल केला होता.

खासदारकी रद्द; काय सांगतो कायदा 

गांधी यांनी आपल्या वक्तव्याद्वारे संपूर्ण मोदी समुदायाला बदनाम केले असल्याचा आरोप पूर्णेश मोदी यांनी केला होता. सुरतच्या न्यायालयाने 23 मार्च रोजी या प्रकरणाचा निकाल देताना गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. लोकप्रतिनिधीत्व कायद्यानुसार कोणत्याही आमदार अथवा खासदाराला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळाची शिक्षा झाली तर त्याची आमदार, खासदारकी रद्द करण्याची तरतूद आहे. त्यानुसार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली होती.

हेही वाचा 

Back to top button