केंद्राच्या अध्यादेशाविरोधात केजरीवाल यांना माकपचा पाठिंबा | पुढारी

केंद्राच्या अध्यादेशाविरोधात केजरीवाल यांना माकपचा पाठिंबा

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा :  दिल्लीतील प्रशासनिक सेवांवर केंद्र सरकारचेच वर्चस्व राहील, असे सांगत केंद्राने काही दिवसांपूर्वी एक अध्यादेश आणला होता. त्या अध्यादेशाला संसदेत विरोध करण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे विरोधी पक्ष नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांना सदर मुद्यावर मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचा पाठिंबा मिळाला आहे.

केजरीवाल यांनी वरील विषयाच्या अनुषंगाने मंगळवारी माकप नेते सीताराम येचुरी यांची भेट घेतली. त्यावेळी येचुरी यांनी केजरीवाल यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला. या मुद्यावर केजरीवाल यांना आतापर्यंत शिवसेना (उद्धव ठाकरे गट ) , भारत राष्ट्र समिती, राष्ट्रवादी – काँग्रेस आणि तृणमूलचा पाठिंबा मिळालेला आहे. केजरीवाल यांनी काँग्रेसकडेही समर्थन मागितले असले तरी काँग्रेसने आपले पत्ते उघड केलेले नाहीत.

दिल्ली ही देशाची राजधानी आहे. त्यामुळे हा प्रदेश राष्ट्रपतींच्या नियंत्रणाखाली राहील, असे केंद्र सरकारने जारी केलेल्या अध्यादेशात म्हटले होते. राजधानीतील सनदी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या तसेच बदल्या नॅशनल कॅपिटल सिव्हिल सर्व्हिसेस ऑथॉरिटीच्या माध्यमातून केल्या जातील, असेही केंद्राने अध्यादेशात स्पष्ट केले होते.

 हेही वाचा : 

Back to top button