भारत निर्माणासाठी यापुढेही मेहनत करत राहणार : पंतप्रधान मोदी, केंद्रातील रालोआ सरकारची ९ वर्षे पूर्ण | पुढारी

भारत निर्माणासाठी यापुढेही मेहनत करत राहणार : पंतप्रधान मोदी, केंद्रातील रालोआ सरकारची ९ वर्षे पूर्ण

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : भारत निर्माणासाठी यापुढेही मेहनत करत राहू, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi ) यांनी मंगळवारी केंद्रातील रालोआ सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केले. आज जेव्हा सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत, तेव्हा मनात विनम्रता आणि कृतज्ञता भरुन आली आहे, असेही मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले.

आपल्या सरकारचा प्रत्येक निर्णय लोकांचे जीवन चांगले बनविण्याच्या इच्छेने प्रेरित असतो, असेही मोदी यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सरकारच्या ९ वर्षाच्या पूर्तीवर म्हणाले की, मोदी सरकारची गत ९ वर्षे सुरक्षा, राष्ट्रीय गौरव, विकास आणि गरीब कल्याणाची राहिली आहेत. एकीकडे देश पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे तर दुसरीकडे सरकारने गरीब कल्याण आणि विकासाच्या बाबतीत नवीन मापदंड स्थापन केले आहेत.

भाजपच्या विशाल जनसंपर्क अभियानालाही प्रारंभ

सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपच्या विशाल जनसंपर्क अभियानालाही सुरुवात झाली आहे. येत्या 30 जूनपर्यंत ही मोहिम चालणार आहे. वर्ष 2024 च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेत सरकारने पुढील महिनाभराच्या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. खुद्द मोदी यांची बुधवारी राजस्थानमधील अजमेर येथे रॅली होणार आहे. आगामी काळात विधानसभा निवडणुका होणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणमध्ये पंतप्रधानांची रॅली होण्याची शक्यता आहे. पक्षाकडून प्रत्येक लोकसभा क्षेत्रात विशेष संपर्क अभियान राबविले जाणार आहे.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या देशभरात ५१ रॅली होणार

केंद्र सरकारच्या योजना आणि धोरणांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने पक्षाने कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. या अंतर्गत जिल्हा, विभाग आणि बूथवर कार्यक्रम होतील. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या देशभरात 51 रॅली होणार असून 396 लोकसभा मतदारसंघांमध्ये जाहीर सभा होतील. या सभांसाठी केंद्रीय मंत्री अथवा राष्ट्रीय पदाधिकारी उपसि्थत राहणे आवश्यक करण्यात आले आहे. भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार आणि आमदारदेखील रॅली व जाहीर सभांमध्ये हजर राहतील. देशभरातील एक लाख कुटुंबांशी थेट संपर्क साधण्याचे उद्दिष्टही भाजपने ठेवले आहे.

Back to top button