पैसा, नोकरी, जमिनीसाठी आई, वडील, आजीची हत्या! | पुढारी

पैसा, नोकरी, जमिनीसाठी आई, वडील, आजीची हत्या!

रायपूर; वृत्तसंस्था : छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यात पुटका या गावातील उदित या मुलाने त्याचे शिक्षक वडील प्रभात भोई, आई सुलोचना भोई व आजी झरना भोई यांची पैसे, जमीन व अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी म्हणून हत्या केली. घटना 7 मे रोजी घडली, तपासाअंती घटनेमागील रहस्य आता उलगडले आहे.

उदितने हत्येनंतर तिन्ही मृतदेह दोन दिवस घरातच लाकडे व सॅनिटायझरच्या मदतीने जाळले. भोई कुटुंबात आता फक्त अमित हा धाकटा मुलगा (मृत प्रभात यांचा) उरला आहे. तो रायपूरमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. प्रभात हे पाकेन गावातील सरकारी शाळेत मुख्याध्यापक होते. 10 हेक्टर जमीनही आहे. गावाच्या टोकावर आठ हजार चौरस फुटावर बांधलेले भले मोठे घरही आहे. उदित हा अमली पदार्थांच्या आहारी गेलेला होता. घराभोवतीची भिंत उंच असल्याने त्याच्या या दुष्कृत्याबद्दल गावकर्‍यांना काही कळलेले नव्हते. उदित नशेसाठी गावात कधी कधी चोर्‍याही करायचा. त्याचे वडील संबंधितांना झालेले नुकसान भरून देत. पोलिसांपर्यंत त्यामुळे कुणी जात नसे. याउपर एका तक्रारीवरून 4 मे रोजी उदितविरोधात एक गुन्हा दाखल झाला होता. वडिलांनी (प्रभात यांनी) त्याला जामिनावर सोडवून आणले. त्यानंतर तीनच दिवसांनी उदितने वडिलांचीच हत्या केली.

Back to top button