असद आणि गुलाम चकमकीत कसे मारले गेले ? उ. प्रदेशच्‍या स्‍पेशल ‘डीजीं’नी दिले उत्तर… | पुढारी

असद आणि गुलाम चकमकीत कसे मारले गेले ? उ. प्रदेशच्‍या स्‍पेशल 'डीजीं'नी दिले उत्तर...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित उमेश पाल हत्‍या प्रकरणातील मुख्य आरोपी माफिया अतिक अहमद याचा मुलगा असद अहमद हा आज चकमकीत ठार झाला. असदसोबत त्याचा साथीदार गुलामही चकमकीत मारला गेला आहे. दोघेही प्रयागराज येथील उमेश पाल हत्या प्रकरणातील आरोपी होते. प्रत्येकावर पाच लाख रुपयांचे बक्षीस होते. दोन्‍ही आरोपी चकमकीत कसे मारले गेले? याचा खुलासा उत्तर प्रदेश कायदा आणि सुव्यवस्था पोलीस महानिरीक्षक प्रशांत कुमार यांनी खुलासा केला आहे. ( Asad Ahmad Encounter)

यावेळी प्रशांत कुमार म्‍हणाले की, प्रयागराज येथे २४ फेब्रुवारी २०२३ रोजी उमेश पाल यांची हत्‍या झाली होती. तेव्‍हापासून असद आणि शूटर गुलाम मोहम्मद हे फरार झाले होते. उत्तर प्रदेश पोलिसांच्‍या विशेष कृती दल ( एसटीएफ ) या दोघांच्‍या मागावर होती. पथकाला दोघेही झाशी येथे असल्‍याची गोपनीय माहिती मिळाली होती.  पोलिसांनी त्‍यानुसार सापळा लावला. आज दुपारी साडेबारा ते एकच्‍या सुमारास ‘एसटीएफ’ने आरोपींना ताब्‍यात घेण्‍याचा प्रयत्‍न केला. तेव्‍हा त्‍यांनी थेट पोलिसांवर गोळ्या झाडल्‍या. यानंतर चकमक उडाली. या चकमकीत उमेश पाल हत्‍या प्रकरणातील आरोपी असद अहमद आणि गुलाम हे ठार झाले. आरोपींकडून अत्याधुनिक विदेशी हत्यारे, जिंवत काडतुसे आदी साहित्य जप्त करण्यात आले आहेत, असेही प्रशांत कुमार यांनी सांगितले.

Back to top button