Gold Price Today | सोन्याच्या दरात बदल, चांदीने गाठला ३२ महिन्यांचा उच्चांकी दर | पुढारी

Gold Price Today | सोन्याच्या दरात बदल, चांदीने गाठला ३२ महिन्यांचा उच्चांकी दर

पुढारी ऑनलाईन : आज सकाळच्या व्यवहारांमध्ये सोन्याचा दर अर्ध्या टक्‍क्‍यांने वाढला तर आज देशांतर्गत बाजारात चांदीचा दर ३२ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला. आज सुरुवातीला MCX (मल्टी कमोडिटी एक्स्चेंज) वर जून २०२३ डिलिव्हरी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६०,३४३ रुपयांवर खुला झाला. तर चांदीने प्रति किलो ७४,५०० रुपयांचा टप्पा पार केला. दरम्यान, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, आज शुद्ध सोने म्हणजे २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ६०,३२४ रुपयांवर खुला झाला आहे. तर चांदीचा दर प्रति किलो ७४, ५१९ रुपयांवर होता.

२३ कॅरेट सोन्याचा दर ६०,०८२ रुपये, २२ कॅरेट ५५,२५६ रुपये, १८ कॅरेट ४५,२४३ रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा दर ३५,२९० रुपयांवर गेला आहे.

आशियाई शेअर बाजारातील सकाळच्या व्यवहारात अमेरिकन डॉलरचा दर कमी झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी खरेदीमध्ये रस दाखवला. परिणामी चांदीच्या दरात आज मोठी वाढ झाली. MCX वर मे २०२३ डिलिव्हरी चांदीचा भाव प्रति किलो ७४,७९० रुपयांवर गेला. हा ३२ महिन्यांचा उच्चांकी दर आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील सत्रात सुमारे १ टक्क्याची घसरण झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा सोन्याच्या किमती वाढल्या. डॉलर कमजोर झाल्याने सोन्याच्या दरात बदल झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड ०.५ टक्के वाढून प्रति औंस १,९९९ डॉलरवर पोहोचले. डॉलर निर्देशांक ०.१ टक्के खाली आला. आता गुंतवणूकदारांचे अमेरिकेच्या महागाई दराकडे लक्ष लागले आहे. या डेटानंतर फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढ करेल की नाही हे चित्र स्पष्ट होणार आहे.

शुद्ध सोने असे ओळखा?

सराफा बाजारात २४ कॅरेट सोने सर्वांत शुद्ध सोने समजले जाते. मात्र दागिने बनविण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा वापर केला जातो. त्यात ९१.६६ टक्के सोने असते. दागिन्यांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्क संबंधित ५ चिन्हे असतात. २४ कॅरेट सोन्यावर ९९९, जर २२ कॅरेट सोन्याचा दागिना असेल तर त्यावर ९१६, २१ कॅरेट दागिन्यावर ८७५ आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यावर ७५० असे लिहिलेले असते. जर दागिना १४ कॅरेटचा असेल तर त्यावर ५८५ असे लिहिलेले असते.

हे ही वाचा :

Back to top button