Ghulam Nabi Azad : कणाहीन लोकच काँग्रेसमध्ये राहू शकतात; गुलाम नबी आझाद यांची टीका | पुढारी

Ghulam Nabi Azad : कणाहीन लोकच काँग्रेसमध्ये राहू शकतात; गुलाम नबी आझाद यांची टीका

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : काँग्रेसमध्ये आता कणाहीन लोकच राहू शकतात. एकदा का तुम्ही काँग्रेसमध्ये राहिलात की, तुमच्याकडे कणा राहत नाही. त्यांच्या आदेशानुसार तुम्हाला वागावे लागते, असा हल्लाबोल गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी राहुल गांधी यांच्यावर केला आहे. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ‘डेमॉक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टी’ नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला आहे. नुकतेच त्यांच्या ‘आझाद’ या आत्मचरित्राचे प्रकाशन झाले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

यूपीए-2 च्या काळात राहुल गांधी यांनी जेव्हा काँग्रेसच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाचा अध्यादेश फाडून टाकला, तेव्हाच पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी त्या कृतीचा विरोध करायला हवा होता. त्या वेळी राहुल यांच्याविरोधात कोणतीही कारवाई न केल्यामुळे यूपीएचे मंत्रिमंडळ कमकुवत असल्याची भावना जनतेत पसरली, असे आझाद (Ghulam Nabi Azad) म्हणाले.

राहुल यांची खासदारकी रद्द झाल्याप्रकरणी ते म्हणाले की, जर राहुल यांनी 2013 साली यूपीए सरकारने काढलेला अध्यादेश फाडला नसता तर आज त्यांचे निलंबन झाले नसते. आम्हाला माहीत होते की, दुसरा पक्ष सत्तेत आल्यानंतर लोकप्रतिनिधी कायद्याचा आमच्याविरोधात वापर करू शकतो. मात्र, राहुल यांनी अध्यादेशाला फालतू म्हटले आणि तो फाडून टाकला. (Ghulam Nabi Azad)

‘पंतप्रधान मोदी दिलदार नेते’ 

काँग्रेसशी एकनिष्ठ राहून मी अनेक वर्षे काम केले. तरीही पक्षाने माझ्याबाबत फारसे औदार्य दाखवले नाही. त्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मला दिलदार मनाचे नेते वाटतात. मी सात वर्षे राज्यसभेत विरोधी पक्षाचा नेता होतो. या काळात मी पंतप्रधान मोदींच्या विरोधात अनेक भाषणे दिली, पण त्यांनी माझ्यावर राग धरला नाही, एका मुत्सद्दी नेत्याप्रमाणे ते वागले. अशा शब्दांत पंतप्रधान मोदींचे कौतुक करून आझाद म्हणाले, पुढची काही दशके काँग्रेस पुन्हा सत्तेत येणार नाही.

अधिक वाचा :

Back to top button