अत्यावश्यक औषधे महागणार; १२ टक्‍के दरवाढ १ एप्रिलपासून लागू | पुढारी

अत्यावश्यक औषधे महागणार; १२ टक्‍के दरवाढ १ एप्रिलपासून लागू

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सुमारे 900 जीवनावश्यक औषधे एक एप्रिलपासून 12 टक्क्यांनी महाग होणार आहेत. यात पेनकिलर, अँटिबायोटिक्स, अँटिइन्फेक्टिव्ह आणि हृदयरोगाशी संबंधित औषधांचा समावेश आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

शेड्युल्ड औषधांचे दर राष्ट्रीय औषध किंमत निर्धारण प्रशासन निश्चित करत असते. ही शेड्युल्ड औषधे सरकारने निर्धारित केलेल्या किमतीलाच विकावी लागतात; तर नॉन शेड्युल्ड औषधांच्या किमती औषध कंपन्यांना ठरवण्याचा अधिकार आहे. नॉन शेड्युल्ड औषधांच्या किमती दरवर्षी दहा टक्क्यांपर्यंत वाढवण्याची कंपन्यांना मुभा आहे.

‘ही’ औषधे होणार महाग

पेनकिलर म्हणून वापरली जाणारी औषधे, प्रतिजैविक अर्थात अँटिबायोटिक्स म्हणून वापरली जाणारी औषधे, अँटिइन्फेक्टिव्ह म्हणून वापरली जाणारी औषधे आणि हृदयविकाराशी संबंधित औषधे या औषधांच्या किमती 1 एप्रिलपासून 12 टक्क्यांनी वाढणार आहेत.

ग्राहकांची नाराजी

मागील काही वर्षांपासून औषध विक्री व्यवसायातील स्पर्धा ध्यानात घेऊन ऑनलाईन औषध विक्रेत्यांशी स्पर्धा करताना स्थानिक विक्रेत्यांनीही सरसकट 10 टक्के सवलत देणे सुरू केले होते. त्यांनी आपल्या नफ्यातील वाटा कमी जरी केला, तरी कंपन्यांचे उत्पन्न घटले नव्हते.

त्यामुळे आता ही नवी दरवाढ आणताना विक्रेत्यांना ग्राहकांच्या नाराजीचा सामना करावा लागणार आहे. शिवाय, या दरवाढीमुळे जेनरिक औषधांची बाजारपेठ वाढण्याची शक्यता आहे.

384 मूळ घटकांच्या किमती वाढल्याने 12 टक्के वाढ

गतवर्षी राष्ट्रीय औषध किंमत निर्धारण प्रशासनाने ठोक मूल्य निर्देशांकात 10.7 टक्के वाढ केली होती. त्यामुळे त्या प्रमाणात औषधांच्या किमती निर्धारित करण्यात आल्या होत्या. यंदा ठोक मूल्य निर्देशांकात 12.12 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे औषधांच्या किमतीत सरासरी 12 टक्के वाढ होणार आहे. प्राप्त माहितीनुसार, 27 थेरपीमध्ये वापरल्या जाणार्‍या 900 फॉर्म्युलेशनमधील 384 मूळ घटकांच्या किमती वाढल्याने ही 12 टक्के वाढ होणार आहे.

Back to top button