हिंदूंचे पूर्वजही मुस्लिमच होते; मौलाना अर्शद मदनींचे वादग्रस्त वक्तव्य | पुढारी

हिंदूंचे पूर्वजही मुस्लिमच होते; मौलाना अर्शद मदनींचे वादग्रस्त वक्तव्य

नवी दिल्ली; वृत्तसंस्था :  इस्लाम हाच सर्वात जुना धर्म आहे. हिंदूंचे पूर्वजही मुस्लिमच होते. पहिले प्रेषित आदम-अलै-सलाम हे भारतीय उपखंडातच दाखल झाले होते. थोडक्यात पृथ्वीवर पहिला मनुष्य अवतरला तेव्हापासून इस्लामचे अस्तित्व आहे. आदमलाच इथे मनू म्हटले जाते. मनू हा अल्लाहचीच उपासना करत होता, असे विधान दिल्लीतील राम लीला मैदानावर आयोजित जमियत-ए-उलेमा-ए-हिंदच्या कार्यक्रमात रविवारी मौलाना अर्शद मदनी यांनी केले आणि एकच वाद झाला.

मदनींच्या या विधानावर हिंदू धर्मगुरूंनी आक्षेप नोंदवला आणि व्यासपीठ सोडले. सरसंघचालक मोहन भागवत यांनी, हिंदू व मुस्लिमांचे पूर्वज एकच असल्याचे विधान केले होते. भागवत यांच्या विधानाचा रोख भारतीय मुस्लिमांचे पूर्वज हे हिंदूच होते, असा होता. त्याविरुद्ध मदनी यांनी वरीलप्रमाणे भाष्य केले.

मौलाना मदनी म्हणाले, ना श्रीराम होते, ना ब्रह्मा होते, ना शिव होते… मग तेव्हा मनूने कुणाची पूजा बांधली? मनू हा अल्लाहचीच पूजा करत होता. आदमच्या मुलांना आपण जसे आदमी म्हणतो, तसेच मनूच्या मुलांना मनुष्य म्हणतो. त्यामुळे अल्लाह हाच खरा देव आहे.
मौलाना अर्शद मदनी हे जमियत प्रमुख मेहमूद मदनी यांचे काका आहेत. भारत हा देश जितका मोदींचा तितकाच मदनींचाही आहे, असे मेहमूद मदनी याच व्यासपीठावरून या आधी म्हणाले होते.

जैन धर्मगुरूंचा मदनींना आक्षेप

मौलाना मदनी यांच्या वक्तव्यावर जैन मुनी लोकेश यांनी तीव्र हरकत नोंदवली. ते म्हणाले की, हे अधिवेशन जर माणसे जोडण्यासाठी आयोजिलेले असेल तर मदनींच्या विधानाला काय औचित्य आहे? अल्लाहने मनुष्याची जात निर्माण केली, यावरच आमचा विश्वास नाही. आम्ही जैन तर तिर्थंकरांनी आम्हाला जन्माला घातले, असेही मानत नाही. देवाने नव्हे तर आई-वडिलांनी आम्हाला जन्म दिला, हे वास्तव आम्ही मानतो. सर्व पंथ समान आहेत, असा संदेश अशा आयोजनांतून अपेक्षित होता. आम्हीच खरे, बाकी खोटे, याला काही अर्थ नाही, असेही मुनी लोकश यांनी स्पष्ट केले. त्यांनी कार्यक्रम स्थळ सोडले. त्यांच्यानंतर अन्य धार्मिक संतांनी या आयोजनातून काढता पाय घेतला.

Back to top button