Bharat Bandh Today : शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला, गाजीपूर सीमेवर ठिय्या | पुढारी

Bharat Bandh Today : शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला, गाजीपूर सीमेवर ठिय्या

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात आज ४० हून अधिक शेतकरी संघटनांनी भारत बंदची (Bharat Bandh Today) हाक दिली आहे. सकाळी ६ ते सायंकाळी ४ पर्यंत सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये, संस्था, बाजार, दुकाने आणि उद्योग बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संयुक्त किसोन मोर्चाच्या नेतृत्त्वाखाली होत असलेल्या या बंदला अनेक राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.

कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी हरियाणात कुरुक्षेत्रच्या शाहाबाद भागातील दिल्ली- अमृतसर राष्ट्रीय महामार्ग बंद केला आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातून गाजीपूरच्या दिशेने जाणारी वाहतूक रोखण्यात आली आहे. याबाबतची माहिती दिल्ली पोलिसांनी ट्विट करत दिली आहे.

गाजीपूर सीमेवर शेतकऱ्यांनी एनएच-९ आणि एनएच २४ वर आंदोलन सुरु केल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
भारत बंद ((Bharat Bandh Today) आंदोलनामुळे हरियाणातील रस्ते, रेल्वे सेवा ठप्प झाली आहे. जिंद जिल्ह्यात २५ ठिकाणी महामार्ग रोखून धरण्यात आला आहे. पंजाबमध्येही अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. येथे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

भारत बंदच्या पार्श्वभूमीवर शंभू सीमा (पंजाब-हरियाणा सीमा) मार्ग सायंकाळी ४ पर्यंत बंद ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत भारत बंदला पाठिंबा दिला आहे. ”शेतकऱ्यांचा अहिंसक सत्याग्रह आजही अखंड सुरु आहे. मात्र, शोषण करणाऱ्या सरकारला हे पसंद नाही. त्यासाठी आज भारत बंद आहे,” असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

भारत बंदला काँग्रेसचा पाठिंबा : नाना पटोले

अकोला : दिल्लीच्या सीमेवर वर्षभरापासून कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. आंदोलना दरम्यान काही शेतकरी शहीद झाले. परंतु केंद्र शासनाने त्याची दखल घेतली नाही. या विषयास अनुसरुन 27 सप्टेंबर रोजी डाव्या संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. त्याला काँग्रेसचा पाठिंबा असून अकोल्यात काँग्रेसची रॅली काढण्यात येणार असल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

तीन कृषी कायद्यांना विरोध, वाढती महागाई, बेरोजगारी, कामगारांचे प्रश्न उग्ररुप धारण करीत असूनही मोदी सरकारचे त्याकडे लक्ष नाही. त्यामुळे निद्रीस्त शासनाला जागे करण्याचा प्रयत्न आंदोलनातून करण्यात येणार आहे. सोमवारच्या आंदोलनानेही शासन नमले नाही तर भविष्यात तीव्र लढा द्यावा लागेल, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

Back to top button