पिंपरी ; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात आपली सत्ता आहे. मात्र, या भागात पालकमंत्री अजित पवार आमचे ऐकत नाहीत, अशी शिवसैनिकांची तक्रार आहे; पण मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. त्यामुळे पवार यांनी आमचेही थोडे ऐकावे; अन्यथा गडबड होईल, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी दिला. दरम्यान, वडगाव शेरी येथे झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील. 2024 नंतरही मुख्यमंत्रिपदी तेच असतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना पदाधिकार्यांचा मेळावा भोसरी येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी राऊत बोलत होते. राऊत म्हणाले की, आपली ओळख आपण निर्माण केली पाहिजे. दिल्लीतील माझा पत्ता सांगताना मोदी माझ्या घरासमोर राहतात, असे मी सांगतो.
शिवसेनेची ओळख कामातून झाली पाहिजे. भोसरीत पक्षाचा एकही नगरसेवक नाही. भोसरीने हात दिला असता, तर आढळराव खासदार झाले असते, असे ते म्हणाले.
महापालिकेचे निकाल असे लागावेत की, शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे. 55 आकड्यांमध्ये आमचा मुख्यमंत्री होतो, तर चाळीस-पंचेचाळीस आकड्याला आमचा महापौर व्हावा, एवढीच माफक अपेक्षा आहे. सर्वांना थोडेथोडे मिळावे. पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये भगवा फडकला नाही, याची खंत आपल्याला हवी. नवी रचना केली आहे, काल काय झाले ते विसरून भविष्यकाळ सेनेचा आहे, अशी खूणगाठ मनाशी बांधली पाहिजे, असे ते म्हणाले.
प्रभाग चारचा झाला म्हणून मागील निवडणुकीत आपल्याला फटका बसला, असे कारण सांगितले जाते. मात्र, त्याचा फटका त्यांना का नाही बसला. कारण, आपला ढाचा ढेपाळलेला आहे. संघटनेची बांधणी कमी पडली. कोणत्या जिद्दीने तुम्ही पुढे जात आहात, हे महत्त्वाचे आहे. कानाकोपर्यातल्या पक्षाचा जयजयकार होतो. मात्र, आपल्याला पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये अस्तित्वासाठी धडपड करावी लागत आहे. घासून का होईना; पण ठासून येऊ, अशी आपली जिद्द असली पाहिजे, असे राऊत म्हणाले.
माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी आताच सांगितले की, येथील पोलीस आयुक्त आमचे ऐकत नाहीत. त्यांनाही मी सांगतो की, सरकार आमचे असेल, तर आमचे ऐकायलाच हवे, असे संजय राऊत म्हणाले. यावेळी शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर, जिल्हा संपर्कप्रमुख सचिन आहेर, खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, शिवसेना जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, गटनेते राहुल कलाटे, माजी आमदार गौतम चाबुकस्वार, राज्य संघटक गोविंद घोळवे, शहरप्रमुख सचिन भोसले, धनंजय आल्हाट आदी उपस्थित होते.
गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो, मग महाराष्ट्राचा का नाही; त्यामुळेच मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते. ते दिल्लीला गेल्यामुळे अनेक जण देव पाण्यात घालून बसले होते; पण त्यांचे शहांशी वैयक्तिक बोलणे झाले नाही. मात्र, उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील. सरकारला पाच वर्षे धोका नाही. एवढेच नव्हे, तर 2024 नंतरही तेच मुख्यमंत्री राहतील, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
शिवसेना पुणे शहर व बारामती लोकसभा पदाधिकारी आढावा बैठक वडगाव शेरी येथील विठ्ठलाजन मंगल कार्यालयात झाली. यावेळी राऊत बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, उपनेते रवींद्र मिर्लेकर, संपर्कप्रमुख सचिन अहिर, आदित्य शिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. आघाडीमध्ये भांड्याला भांडे लागणारच. युती, आघाडी करायची नसेल, तर त्यासाठी 150 आमदार निवडून द्यावे लागतील. अजित पवार चांगले काम करीत असून, आम्ही आता पहाटेचा कार्यक्रम विसरलो आहोत. शिवसेनेच्या वाट्याला कोणी जाऊ नका, ती आग आहे. राज्यात शिवसेना पाहिल्या क्रमांकाचा पक्ष व्हावा, अशी मुख्यमंत्र्यांची अपेक्षा आहे, असे खा. राऊत म्हणाले.
उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी महापालिकेत भाकरी फिरवून नवीन माणसांना संधी द्यावी. महिला आघाडीलादेखील महापालिकेत स्थान द्यावे. भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी महिला अधिकार्याबद्दल अपशब्द वापरले असून, त्यांच्याविरुद्ध शिवसेना महिला आघाडीने गुन्हा दाखल करावा; पुढचे मी पाहते, असा इशाराही गोर्हे यांनी दिला.
अजित पवार आमचे ऐकत नाहीत, या स्थानिक पदाधिकार्यांच्या तक्रारीबाबत बोलताना राऊत मिश्कीलपणे म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला गेले आहेत, हे लक्षात ठेवा. माध्यमांनी याचा वेगळा अर्थ काढू नये, असे स्पष्ट करताना ते म्हणाले, शिवसेनेला आता दिल्लीमध्ये राज्य करायचे आहे. यासाठी दिल्लीचा अंदाज घेण्यासाठी ते गेले आहेत. पंतप्रधान, गृहमंत्री कुठे बसतात याची माहिती ते घेत आहेत.