मुंबई; पुढारी वृत्तसेवा : आरोग्य विभागाच्या 6 हजार 205 पदांसाठी होणारी व पुढे ढकलण्यात आलेली परीक्षा 15, 16 किंवा 22, 23 ऑक्टोबर रोजी घेतल्या जातील. त्यासंदर्भात सोमवारी (ता.27) आरोग्य विभागाच्या बैठकीत तारीख निश्चित करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रविवारी दिली.
आरोग्य मंत्री टोपे म्हणाले की, ऐनवेळी परीक्षा रद्द करावी लागल्याने उमेदवारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे पुढील 15 -20 दिवसात परीक्षा घेण्याचे आमचे नियोजन आहे. 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होत आहेत. पूर्वीच्या तारखा अनेक कारणांनी नोंदलेल्या आहेत. 15 व 16 ऑक्टोबर रोजी रेल्वेची नियोजित परीक्षा आहे.
त्यामुळे त्या दिवशी परीक्षा घेता येतील का याची चाचपणी करू अन्यथा 22 व 23 ऑक्टोबर रोजी ही परीक्षा घेतली जाऊ शकते. मात्र, यावेळी कोणतेही धोका पत्करला जाणार नाही. परीक्षांना आठवडाभर उशिर झाला तरी चालेल परंतु, सर्व खबरदारी घेऊन पुढील तारखा जाहीर केल्या जातील, असे टोपेंनी सांगितले.
आरोग्य विभागाच्या गट- क आणि ड संवर्गातील 6 हजार 205 पदांसाठी 25 आणि 26 सप्टेंबरला लेखी परीक्षा घेतली जाणार होती. राज्यातील 1500 केंद्रांवर एकाच वेळी परिक्षा होणार होती. विद्यार्थ्यांना दोन दिवसांआधी ओळखपत्र देण्यात आले. या ओळखपत्रांमध्ये अक्षम्य चुका होत्या. काही विद्यार्थ्यांचे ओळखपत्रच डाऊनलोड होत नसल्याने त्यांना ई-मेलवर नाव आणि परीक्षा केंद्र व बैठक क्रमांक पाठवण्यात आले. या ई-मेलवरही अनेक चुकीचे केंद्र देण्यात आले.
न्यासा या खासगी व बाह्य स्त्रोत असलेल्या आयटी कंपनीच्या गोंधळामुळे अखेर राज्य सरकारला परीक्षा पुढे ढकलाव्या लागल्या. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना परिक्षेपासून वंचित राहण्याबरोबरच मनस्तापाला सामोरे जावे लागले. यामुळे राज्य सरकारची मोठी नाचक्की झाली.
आता परीक्षेच्या तयारीसंदर्भात सोमवारी (ता.27) आरोग्य विभाग व न्यासा कंपनीच्या प्रतिनिधींसोबत बैठक होणार आहे. या बैठकीनंतर परीक्षेच्या नव्या तारखा ठरवल्या जाणार आहेत.
सामान्य प्रशासन विभागांतर्गत असलेल्या माहिती व तंत्रज्ञान (आयटी) विभागाने परीक्षा घेण्यासाठी फडणवीस सरकारच्या काळात न्यासासह काही कंपन्यांची निवड केली. न्यासा कंपनी आरोग्य विभागाने निवडलेली नाही. या परीक्षेसंदर्भात आरोग्य विभागाची प्रश्नपत्रिका तयार करणे इतकीच जबाबदारी होती, असे राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.