विशालकाय धूमकेतू सूर्याच्या दिशेने झेपावतोय | पुढारी

विशालकाय धूमकेतू सूर्याच्या दिशेने झेपावतोय

नवी दिल्ली : एक विशालकाय धूमकेतू सूर्याच्या दिशेने जात आहे. हा धूमकेतू आकाराने मंगळाच्या चंद्रापेक्षाही मोठा आहे. खगोल शास्त्रज्ञांच्या मते हा विशालकाय धूमकेतू 2031 मध्ये सूर्याच्या अगदी जवळ जाणार आहे.

या धूमकेतूला कॉमेट सी/2014 यूएन 271 असे अधिकृत नाव देण्यात आले आहे. मात्र यास कॉमेट बेर्नार्डिनेल्ली बर्नस्टेन असेही म्हटले जाते. कारण या धूमकेतूचा शोध पेड्रो बेर्नार्डिनेल्ली आणि गॅरी बर्नस्टेन या खगोल शास्त्रज्ञांनी लावला आहे. या धूमकेतूबाबत करण्यात आलेल्या संशोधनानुसार हा धूमकेतू आकाराने फारच मोठा आहे. इतका मोठा धूमकेतू आजपर्यंत पाहण्यात आलेला नाही. असे अत्यंत कमी धूमकेतू सूर्यमालेतून प्रवास करत असतात.

सूर्याच्या दिशेने जात असलेल्या या धूमकेतूचा व्यास सुमारे 150 कि.मी. इतका मोठा आहे. यापूर्वी करण्यात आलेल्या आणखी एका संशोधनात याचा व्यास 125 मैल (200 कि.मी.) असू शकतो. मात्र, अ‍ॅस्ट्रोफिजिकल जर्नल लेटर्स नामक जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार याचा व्यास सुमारे 93 मैल (150 कि.मी.) इतका आहे.

हा धूमकेतू प्रचंड वेगाने सूर्याच्या दिशेने जात असला तरी त्याला तेथे पोहोचण्यास अजूनही सुमारे 9 वर्षांचा कालावधी लागणार आहे. सूर्याच्या वरच्या भागाचे तापमान प्रचंड आहे. यामुळे हा धूमकेतू जर सूर्याच्या अगदी जवळ गेला तर प्रचंड तापमानात त्याचे नेमके काय होणार, याची उत्सुकता आतापासूनच शास्त्रज्ञांना लागली आहे.

Back to top button