Elon Musk and Grimes : तीन वर्षांनंतर अ‍ॅलन मस्क-ग्रिम्स झाले वेगळे | पुढारी

Elon Musk and Grimes : तीन वर्षांनंतर अ‍ॅलन मस्क-ग्रिम्स झाले वेगळे

न्यूयॉर्क : अब्जाधीश उद्योगपती अ‍ॅलन मस्क आणि प्रख्यात गायिका ग्रिम्स (Elon Musk and Grimes) हे तीन वर्षे एकत्र राहिल्यानंतर वेगळे झाले आहेत. टेस्ला आणि स्पेस एक्सचे संस्थापक मस्क यांनी ‘पेज सिक्स’वरून आपण ग्रिम्सशी वेगळे होत असल्याची माहिती दिली.

‘पेज सिक्स’वर वेगळे होण्यासंबंधीची माहिती शेअर करताना मस्क यांनी सांगितले की, आम्ही वेगळे होत असलो तरी आमचे एकमेकांवर प्रेम आहे आणि सातत्याने एकमेकांना भेटत राहू. कॅनेडियन गायिका ग्रिम्स आणि मस्क यांना एक वर्षाचा मुलगा आहे. ग्रिम्स व मस्क वेगळे झाल्यानंतर मुलाच्या कस्टडीवरून लोकांनी मीम्स शेअर करण्यास सुरुवात केली आहे. या मुलाचा मे 2020 मध्ये जन्म झाला होता. हे मूल सुरुवातीपासूनच चर्चेचे राहिले आहे. अ‍ॅलन मस्क व ग्रिम्स (Elon Musk and Grimes) यांची मे 2018 मध्ये भेट झाली होती.

त्यानंतर मे 2020 मध्ये उभयतांना मुलगा झाला. मात्र, सुमारे तीन वर्षे एकत्र राहिल्यानंतर ते वेगळे होत आहेत. मस्क यांचा यापूर्वी कॅनेडियन लेखिका जस्टिन विल्सन यांच्याशी विवाह झाला होता. मस्क व विल्सन यांना पाच मुले आहेत. ग्रिम्सशी वेगळे होण्याचे कारण देताना मस्क यांनी सांगितले की, ग्रिम्स आजही कॅलिफोर्नियातील आपल्या घरात राहते.

मात्र, ग्रिम्सचे काम प्रामुख्याने लॉस एंजेलिस येथे आहे. तर स्पेस एक्स आणि टेस्लाच्या कामासाठी मला एक तर टेक्सास अथवा विदेश प्रवासावर राहावे लागते. आम्ही जरी वेगळे होत असलो तरी आम्ही दोघेही मुलाचे पालनपोषण एकत्रपणे करणार आहोत.

Back to top button