सोलापूर : अतिवृष्टीमुळे नुकसान; तरुण शेतकर्‍याची आत्महत्या | पुढारी

सोलापूर : अतिवृष्टीमुळे नुकसान; तरुण शेतकर्‍याची आत्महत्या

बार्शी; पुढारी वृत्तसेवा : अतिवृष्टीमुळे ओढ्याचे पाणी शेतात घुसून उडदाचे पीक प्रवाहात वाहून गेले. सोयाबीन पीकही पाण्यात गाडले गेले. याला वैतागून श्रीपतपिंपरी (ता. बार्शी) येथील तरुण शेतकर्‍याने शेतातील चिंचेच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे.

समाधान बबन क्षीरसागर (वय 24, रा. श्रीपतपिंपरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. मृताचे वडील बबन क्षीरसागर (वय 65) यांनी याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

त्यांचा थोरला मुलगा समाधान क्षीरसागर हा शेती व मजुरी व्यवसाय करीत होता. श्रीपतपिंपरी येथे त्यांच्या मालकीची पावणेदोन एकर शेती आहे. यावर्षी उडीद व सोयाबीन पिकांची लागवड केली होती.

नुकतेच 22 सप्टेंबर 2021 रोजी श्रीपतपिंपरी येथे अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे शेताशेजारीच असलेल्या घोर ओढ्यात जास्त पाणी आल्याचे समजल्याने थोरला मुलगा समाधान हा 23 रोजी सकाळी शेताची पाहणी करण्यासाठी शेतात गेला होता. घरी आल्यानंतर त्याने वडिलांना, आपल्या शेतात पाणी शिरले असून शेतातील काढलेला उडीद हा पाण्यात वाहून गेला आहे. सोयाबीनही पाण्याखाली आहे. त्यामुळे आपले शेतीचे पूर्ण नुकसान झाले आहे. आता मला काही कामही

नाही, मी काय करू, अशी माझी अवस्था झाली आहे. मला मरण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत नाही. असे म्हणून तो सेंट्रींगच्या कामाला मी बार्शी येथे जातो, असे सांगून निराश होऊन तो घरातून निघून गेला होता. त्यानंतर तो त्यादिवशी घरी आलाच नाही. त्याच्या ठेकेदारास समाधानबाबत विचारणा केली असता त्याने समाधान घरी गेल्याचे सांगितले.

त्याची आसपास शोधाशोध केली परंतु तो कोठेच मिळुन न आल्याने 24 रोजी तो बेपत्ता असल्याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात नोंद केली होती. त्यानंतर दुपारच्या सुमारास गावातील शेळ्या राखणार्‍या व्यक्तीस समाधानने चिंचेच्या झाडास गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button