भारत जोडोत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा | पुढारी

भारत जोडोत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा

भोपाळ; वृत्तसंस्था : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशात भारत जोडो यात्रेच्या तिसर्‍या दिवशी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या, असा आरोप भाजपतर्फे करण्यात आला आहे. यात्रेच्या यशाने भाजपच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्यामुळे भाजप असे आरोप करत आहे, असे स्पष्टीकरण काँग्रेसकडून देण्यात आले आहे. भाजप नेते व्ही. डी. शर्मा यांनी सोशल मीडियावरून एक व्हिडीओ शेअर करून त्याद्वारे राहुल गांधींच्या यात्रेत पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा दावा केला. यानंतर दोन्ही पक्षांत वाक्युद्ध पेटले आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी, याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले असून, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणार्‍यांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. भाजप नेत्यांनी शेअर केलेला व्हिडीओ नेमका कुठला आहे, ते स्पष्ट केलेले नाही.

राहुल गांधी यांची यात्रा सध्या खरगोन जिल्ह्यात असून, यात्रेत प्रियांका गांधी, त्यांचे पती रॉबर्ट वधेरा, माजी मुख्यमंत्री कमलनाथ, दिग्विजय सिंह सहभागी आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी भाजपच्या या आरोपांचा समाचार घेतला आहे.

बॉम्बस्फोटाची धमकी देणार्‍याला अटक

इंदूर : वृत्तसंस्था : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मध्य प्रदेशात येण्याआधी एका पत्राच्या माध्यमातून इंदूरमध्ये या यात्रेत बॉम्बस्फोट घडवून राहुल गांधी यांची हत्या करण्याची धमकी देणार्‍या इसमाला अखेर अटक करण्यात आली आहे. नरेंद्र सिंह असे या व्यक्तीचे नाव असून, त्याला उज्जैन पोलिसांनी अटक करून इंदूर पोलिसांच्या हवाली केले आहे.

राहुल गांधी यांची पदयात्रा महाराष्ट्रात शेवटच्या टप्प्यात असताना इंदूरमध्ये एका मिठाईच्या दुकानात एक पत्र सापडले होते. त्यात या यात्रेच्या दरम्यान इंदूरमध्ये बॉम्बस्फोट घडवून राहुल गांधी यांची हत्या करण्याची धमकी देण्यात आली होती. यामुळे एकच खळबळ उडाली होती. राहुल गांधी यांच्या यात्रेचा खालसा स्टेडियमवर मुक्काम ठेवण्यावरून शीख समाजाकडून झालेला विरोध व पाठोपाठ ही धमकी, यामुळे पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले. पोलिसांनी 200 सीसीटीव्हींचे फुटेज तपासले, डझनभर हॉटेल व लॉजेसची झडती घेतली तसेच रेल्वेस्थानकांवरही झाडाझडती घेण्यात आली.

Back to top button