भारताच्या आयएनएस ध्रुव चे समुद्र अवतरण | पुढारी

भारताच्या आयएनएस ध्रुव चे समुद्र अवतरण

विशाखापट्टणम ; वृत्तसंस्था : शत्रूकडून होणार्‍या अणुहल्ल्याला क्षणात निष्प्रभ करून सोडण्याची क्षमता असलेली भारताची ‘आयएनएस ध्रुव’ ही पहिली क्षेपणास्त्रभेदी युद्धनौका निळ्याशार समुद्रात मोठ्या दिमाखात शुक्रवारी अवतरली. हिंद-प्रशांत क्षेत्रातील बॅलिस्टिक युद्धाच्या वाढत्या धोक्यावर ही युद्धनौका एक उतारा ठरली आहे.

जहाजाचे वजन 10 हजार टन आहे. हिंदी महासागरातील भारताची सुरक्षा यंत्रणा त्यामुळे अभेद्य झाली आहे. अत्यंत लांब अंतरावरील बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे (जमिनीवरून आकाशात जाऊन पुन्हा जमिनीवर मारा करणारी) आयएनएस ध्रुवच्या रडार यंत्रणेच्या टप्प्यात येतील. यानंतर ती लक्ष्यभेद करण्यापूर्वीच नष्ट करण्यात येतील.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संघटनेच्या सहकार्याने ‘हिंदुस्थान शिपयार्ड’ने हे जहाज तयार केले आहे. समुद्रतळातील सबमरिनचाही (पाणबुड्या) वेध घेण्याची क्षमता या जहाजात आहे. देशातील महानगरे आणि लष्करी संस्थांवरील शत्रूच्या संभाव्य क्षेपणास्त्र हल्ल्याच्या वेळी याधोक्याची सूचनाही हे जहाज आधीच देईल. चीनसह पाकिस्तान हे दोन्ही देश आण्विक क्षेपणास्त्रसज्ज आहेत. नौकेची लांबी 175 मीटर, तर रुंदी 22 मीटर आहे. दोन फुटबॉल मैदाने बसतील एवढे अवाढव्य हे जहाज आहे.

जहाजावर एकाचवेळी 300 सैनिक सेवा बजावू शकतील, अशी सुविधा आहे. 9000 किलोव्हॅटचे डिझेल इंजिन आहे. ताशी 40 किमीपर्यंत अंतर कापण्याची क्षमता आहे. 1200 किलोव्हॅट क्षमतेचे दोन ऑक्सिलेटरी जनरेटर या नौकेत आहेत. यावरील रडार एकाच वेळी 10 लक्ष्यांचा वेध घेऊ शकते.

वर्षभरात अवतरणार युद्धनौका

या वर्षात भारत अशा चार युद्धनौकांचे लाँचिंग करणार आहे. पैकी आज लाँचिंग झालेले बॅलिस्टिक मिसाईल ट्रॅकिंग आयएनएस ध्रुव हे एक आहे. याशिवाय स्टिल्थ गायडेड मिसाईल विध्वंसक आयएनएस विशाखापट्टणम, सबमरीन आयएनएस वेला, कलवरी वर्षाच्या शेवटापर्यंत लाँच होतील.

Back to top button