आम्हाला तुमचा अभिमान! इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्याकडून जावई ऋषी सुनक यांना शुभेच्छा | पुढारी

आम्हाला तुमचा अभिमान! इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्याकडून जावई ऋषी सुनक यांना शुभेच्छा

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak UK PM) यांची निवड झाली आहे. ऋषी सुनक हे भारतीय सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतर नारायण मूर्ती यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. “ऋषी यांचे अभिनंदन. आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि आम्ही त्यांना शुभेच्छा देतो. आम्हाला विश्वास आहे की ते ब्रिटनमधील लोकांसाठी चांगले काम करतील.” अशी प्रतिक्रिया नारायण मूर्ती यांनी दिली आहे. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने सुनक यांची या पदावर निवड करण्यात आली आहे. ते ग्रेट ब्रिटनचे पहिले आशियायी पंतप्रधान ठरले आहेत.

राजकारणातील ऋषी

ऋषी सुनाक हुजूर पक्षातील हुकमाचा एक्का आहेत. २०१५ मध्ये त्यांना यॉर्क्सच्या रिचमंड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. ऋषी तेव्हापासून या जागेवर सातत्याने निवडून येत आहेत. बोरिस जॉन्सन यांनी ऋषी यांना २०१९ मध्ये ‘चिफ सेक्रेटरी ऑफ ट्रेझरी’ म्हणून नियुक्त केले होते. या नियुक्तीच्या दुसर्‍याच दिवशी त्यांना प्रिव्ही कौन्सिलचे सदस्यपदही देण्यात आले. १३ फेब्रुवारी 2020 रोजी मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेत त्यांना अर्थमंत्री करण्यात आले.

कोण आहेत ऋषी सुनक?

ऋषी सुनाक यांचे आई-वडील भारतातील पंजाबचे मूळ रहिवासी आहेत. ते ब्रिटनमध्ये स्थायिक झाले. ऋषी हे भारतीय सॉफ्टवेअर कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. ऋषी यांच्या मातोश्री ब्रिटनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागात फार्मासिस्ट आहेत. ऋषी यांचा जन्म हॅम्पशायरयेथे झाला. अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले. ऑक्सफर्ड विद्यापीठातून राजकारण, तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्राचे शिक्षण घेतले. ऋषी यांचे वडीलही याच दोन्ही विद्यापीठांचे पदवीधर आहेत. ऋषी यांच्या पत्नीचे नाव अक्षता मूर्ती आहे. २००९ मध्ये त्यांचे लग्न झाले होते. दोघांना कृष्णा आणि अनुष्का या दोन मुली आहेत. राजकारणात येण्यापूर्वी ऋषी यांनी गोल्डमन सॅक्स बँक तसेच हेज फंडमध्ये या वित्तीय आस्थापनांतून मोठ्या जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. पुढे त्यांनी स्वत:चे एक गुंतवणूक प्रतिष्ठानही स्थापन केले होते. ते व्यवसायाने बँकर असून, माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.

हे ही वाचा :

Back to top button