पुढारी ऑनलाईन डेस्क : ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak UK PM) यांची निवड करण्यात आली आहे. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेतल्याने सुनक यांची या पदाच्या निवडीची औपचारिकता बाकी होती. जी आज पार पडली. ग्रेट ब्रिटनचे ते पहिले आशियायी पंतप्रधान ठरले आहेत.
बोरिस जॉन्सन यांनी माघार घेतल्याने सुनक यांचा '10th डाऊनिंग स्ट्रीट'वर जाण्याचा मार्ग मोकळा झाला होता. सोमवारी त्याच्या पंतप्रधान निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आला. 10th डाऊनिंग स्ट्रीट हा ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या निवास स्थानाचा पत्ता आहे. याला क्रमांक १० म्हटले जाते. हुजुर पक्षाच्या 140 खासदारांचा सुनक यांना पाठिंबा मिळाला असल्याचे समजते आहे. (Rishi Sunak UK PM)
सुनक यांना 200 खासदारांचा पाठिंबा
भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनचे नवे पंतप्रधान असतील. सोमवारी कंझर्व्हेटिव्ह पार्टीच्या संसदीय दलाने सुनक यांची नेता म्हणून निवड केली. सुनक यांना सुमारे 200 खासदारांचा पाठिंबा मिळाला. तर प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डॉन्ट यांना केवळ 26 खासदारांचा पाठिंबा मिळाल्याने त्यांनी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. यानंतर आपसूकच सुनक यांचा ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, आज सकाळीच माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनीही आपले नाव मागे घेतले होते.
वृत्तानुसार, किंग चार्ल्स आज रात्री सँडरिंगहॅमहून लंडनला परतत आहेत. त्यानंतर लिझ ट्रस आपला राजीनामा त्यांच्याकडे सादर करतील. त्यानंतर काही वेळाने किंग चार्ल्स हे सुनक यांना पंतप्रधान पदाच्या नियुक्तीचे पत्र सुपूर्द करतील. 28 ऑक्टोबर रोजी सुनक पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यानंतर 29 ऑक्टोबरला मंत्रिमंडळाची घोषणा होणार आहे.
आयटीव्हीचे राजकीय संपादक रॉबर्ट पेस्टन यांनी ब्रिटिश इतिहासातील हा अत्यंत महत्त्वाचा क्षण असल्याचे म्हटले आहे. ते म्हणतात, "हुजुर पक्षाचे खासदार ब्रिटिश भारतीयाची त्यांचा नेता म्हणून आणि ब्रिटनचा पंतप्रधान म्हणून निवड करतील, ब्रिटनच्या इतिहासासाठी हा अत्यंत महत्वाचा क्षण असेल."
जॉन्सन यांनी 100 खासदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले होते, पण प्रत्यक्षात ही संख्या 50 पेक्षा जास्त नव्हती. तर दुसरीकडे पक्षांतर्गत विविध गटांनी आणि उजव्या विचारांच्या नेत्या सुएल्ला ब्रेवरमॅन यांनीही सुनक यांना पाठिंबा दिला असल्याचे पुढे आले होते. हाऊस ऑफ कॉमनमधील पक्षाच्या नेत्या पेनी मौरडाऊंट पंतप्रधानपदाच्या शर्यतीत होत्या, पण त्यांना फक्त 28 खासदारांचा पाठिंबा मिळाल्याचे समोर आले होते. त्यामुळे जॉन्सन यांना पाठिंबा देणारे खासदार पेनी यांना मदत करतील आणि सुनक पंतप्रधान पदी विराजमान होतील, अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली होती. सुनक हे गेल्या 3 महिन्यांतील ब्रिटनचे तिसरे पंतप्रधान ठरले आहेत. ते इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावाई आहेत. त्यांची पत्नी अक्षता अब्जाधिश आहे.