मुलायमसिंह यादव अनंतात विलीन; अखिलेश यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी | पुढारी

मुलायमसिंह यादव अनंतात विलीन; अखिलेश यांनी दिला पार्थिवाला मुखाग्नी

पुढारी ऑनलाईन डेस्क: समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांच्या पार्थिवावर मंगळवारी (दि.११) सैफई या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. यावेळी ‘मुलायम सिंह यादव जिंदाबाद’, ‘नेताजी अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या. अंत्यसंस्काराला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह देखील उपस्थित होते.

माजी केंद्रीय मंत्री मुलायम सिंह यादव यांचे सोमवारी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात निधन झाले. त्यांना अनेक आजारांनी ग्रासले होते. त्यांना महिनाभरापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सोमवारी संध्याकाळीच त्यांचे पार्थिव इटावा येथील त्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानी सैफई येथे पोहोचले. काल सायंकाळपासूनच त्यांना अखेरचा निरोप देणाऱ्यासाठी नागरिकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी गर्दी केली होती. त्याचबरोबर मैनपुरी आणि इटावा जिल्ह्यातील नागरिक सोमवारपासून अंतिम दर्शनासाठी गर्दी करत होते.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी संध्याकाळी सैफईला भेट देऊन मुलायम सिंह यांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर सीएम योगी मंगळवारी सकाळीही सैफईला पोहोचले. त्यांच्याशिवाय राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठकही पोहोचले. त्यांनी अखिलेश यादव यांचे सांत्वन केले.

याशिवाय सपा खासदार जया प्रदा, अभिनेता अभिषेक बच्चन, उद्योगपती अनिल अंबानी, सुब्रत राय सहारा, भाजप खासदार वरुण गांधी, शरद यादव, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि योगगुरू बाबा रामदेव यांनीही श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button