Aaron Finch : ॲरॉन फिंचकडून पंचांना शिवीगाळ, टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर होण्याचा धोका! | पुढारी

Aaron Finch : ॲरॉन फिंचकडून पंचांना शिवीगाळ, टी 20 वर्ल्ड कपमधून बाहेर होण्याचा धोका!

पुढारी ऑनलाईन डेस्क : AUS vs ENG : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या पहिल्या टी 20 सामन्याची खूप चर्चा झाली. खेळाचा विचार केला तर, या सामन्यात जिथे 400 हून अधिक धावा झाल्या, तिथेच या सामन्यात वादाचे प्रसंगही घडले. ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेडने इंग्लिश गोलंदाज मार्क वूडला धक्का देण्याचे प्रकरण मिटले नव्हते तोच ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचच्या (Aaron Finch) एका कृत्याने नवा वाद निर्माण झाला. फिंचच्या या कृतीमुळे संतप्त झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) त्याला फटकारले आहे.

खरंतर रविवारी पर्थमध्ये इंग्लंडविरुद्धच्या मॅचमध्ये अॅरॉन फिंचने (Aaron Finch) पंचांशी वाद घालताना त्यांना शिवीगाळ केली. हे सर्व संभाषण स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाले. ही संपूर्ण घटना इंग्लंडच्या डावाच्या नवव्या षटकात घडली. तेव्हा बटलरला चकवा देत चेंडू विकेटच्या मागे मॅथ्यू वेडकडे गेला. यानंतर फिंचने झेल घेतल्याचे अपील केले. मात्र पंचांनी नाबाद असल्याचा निर्णय दिला. यानंतर संतापलेल्या फिंचने पंचांशी वाद घातला. तसेच त्याने पंचांना अपशब्द उच्चारले. (AUS vs ENG)

फिंचचे हे कृत्य आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 1 मध्ये दोषी आढळले. त्याला आयसीसीने कलम 2.3 चे उल्लंघन केल्याबद्दल ताकीद देण्यात आली. या नियमानुसार, कोणत्याही आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान अपशब्द वापरणे चुकीचे आहे. फिंचने त्याच्या चुकीची पुनरावृत्ती केल्यास तो इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेतून किंवा टी 20 विश्वचषकातूनही बाहेर होऊ शकतो. ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड सुरू असलेल्या मालिकेतील अजून दोन टी 20 सामने बाकी आहेत, या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाने गमावला आहे. (AUS vs ENG)

ऑस्ट्रेलियन कर्णधारानेही आपली चूक मान्य केली. त्यानंतर त्याला पहिला इशारा देण्यात आला आणि त्याच्या खात्यात एक डिमेरिट गुणही जोडण्यात आला. याचा अर्थ फिंचने या वर्षी पुन्हा अशी चूक केली तर त्याच्यावर एका सामन्याची बंदीही लागू शकते. जेव्हा एखाद्या खेळाडूला 24 महिन्यांत चार किंवा त्याहून अधिक डिमेरिट गुण मिळतात, तेव्हा त्याच्यावर बंदी घातली जाते. (AUS vs ENG)

काही काळापासून फॉर्मशी झगडत असलेला ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंच आपल्या लयीत परतताना दिसत आहे. पहिल्या सामन्यात त्याने फलंदाजीचा क्रमही बदलला आणि त्याचा त्याला फायदाही झाला. फिंच आता पुन्हा एकदा वॉर्नरसोबत डावाची सुरुवात करताना दिसणार आहे. (AUS vs ENG)

2022 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाचे नेतृत्व आरोन फिंच करणार आहे. ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना 22 ऑक्टोबरला न्यूझीलंडशी होणार आहे.

टी 20 विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियन संघ :

अॅरॉन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड (विकेटकीपर), डेव्हिड वॉर्नर, मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क आणि अॅडम झाम्पा.

Back to top button