शिरोली-पंचगंगा पिलर पुलासाठी नवे डिझाईन : नितीन गडकरी | पुढारी

शिरोली-पंचगंगा पिलर पुलासाठी नवे डिझाईन : नितीन गडकरी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील शिरोली ते पंचगंगा पूल या ठिकाणी उभारण्यात येणार्‍या पिलरच्या पुलासाठी नव्याने डिझाईन बनविणे आवश्यक असून, लवकरच त्याची पूर्तता केली जाईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी दिली.

महायुतीचे उमेदवार खा. संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी सेतू संस्थेतर्फे आयोजित ‘कॉफी वुईथ नितीनजी’ या कार्यक्रमात व्यापारी, उद्योजकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. महासैनिक दरबार हॉलमध्ये कार्यक्रम झाला. यावेळी असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस्तर्फे याबाबतचा प्रश्न विचारण्यात आला. कोल्हापूरला इथेनॉल आणि वाहन उद्योगात मोठी संधी असल्याचेही गडकरी यांनी सांगितले.

गडकरी म्हणाले, पिलरच्या पुलाबाबत माझ्याकडून मान्यता आहे. मात्र, सध्या ज्या ठेकेदारास हे काम दिले आहे. त्या ठेकेदाराकडे नव्या पिलर पुलाच्या अतिरिक्त कामासंदर्भात क्षमता (अ‍ॅडिशनल स्कोप ऑफ वर्क) नाही. त्यामुळे नव्याने डिझाईन बनवावे लागेल. नव्याने ठेकेदार नेमायचा की, आणखी काही पर्याय आहे, याचा अभ्यास सुरू आहे. चांगला पर्याय उपलब्ध करून नव्याने डिझाईन बनवून हा पिलरचा पूल उभारला जाईल. त्याबाबत युद्धपातळीवर प्रक्रिया सुरू आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत पुलामुळे महापुराचे पाणी महामार्गावर थांबणार नाही. कोल्हापुरात महापुराचे पाणी शिरणार नाही, याची खात्री देतो, असेही गडकरी म्हणाले.

या पुढील काळ हा इथेनॉल, मिथेनॉल, हायड्रोन याचा असणार आहे. कोल्हापूर जिल्हा सहकार आणि उद्योगांनी व्यापला असून, येथे मोठ्या प्रमाणात क्रयशक्ती आहे. त्यातून कोल्हापुरातील उद्योग क्षेत्राला चालना मिळून रोजगार उपलब्ध होतील. भविष्यात देशाचा विकास करायचा असेल, तर आपल्याला इकॉनॉमिक मॉडेल स्वीकारावे लागेल. ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठे हब बनण्याची क्षमता कोल्हापूरमध्ये आहे, असेही त्यांनी सांगितले.

गडकरी म्हणाले, कोल्हापुरात एवढे साखर कारखाने आहेत. कोल्हापूरकरांनी असे विमानतळ तयार करावे की, येणारे प्रत्येक विमान या ठिकाणी टँक फुल्ल करून गेले पाहिजे. कोल्हापूरकर शेतकर्‍यांनी तयार केलेले इंधन त्यात भरले गेले पाहिजे. हुपरीच्या चांदी उद्योगासाठी सिल्व्हर डिझाईन इन्स्टिट्यूट, टेक्स्टाईल डिझाईन इन्स्टिट्यूट सुरू करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले.

50 लाख कोटींची विकासकामे

गेल्या दहा वर्षांत माझ्या मंत्रालयाच्या वतीने देशात 50 लाख कोटींची विकासकामे केल्याचे सांगून गडकरी म्हणाले, देशात आज 200 लाख कोटींची मूलभूत सुविधांची विकासकामे ही लोकांच्या गुंतवणुकीतून होऊ शकतात. मला श्रीमंत माणसांच्या पैशाने रस्ते बांधायचे नाहीत, तर गरीब माणसांच्या पैशाने रस्ते बांधायचे आहेत. गरीब, ज्येष्ठ नागरिक, नोकरदार आदींनी गुंतवणूक केल्यास त्यांना वर्षाला 8.2 टक्के व्याज मिळेल. तसेच व्याजाची रक्कम महिन्याला त्यांच्या बँक खात्यावर जमा होईल.

पुण्यात 50 हजार कोटींचे रस्ते

पुण्यात 50 हजार कोटींचे रस्ते करणार असल्याचे सांगून मंत्री गडकरी म्हणाले, पुणे-छत्रपती संभाजीनगर या रस्त्याचे डिझाईन आणि डीपीआर तयार आहे. जमिनीवर रस्ता, त्यावर उड्डाणपूल, त्यावर पुन्हा उड्डाणपूल आणि त्याच्यावर मेट्रो धावेल. त्यामुळे पुण्यातील ट्रॅफिकचा प्रश्न सुटेल. तसेच नवीन रस्त्यामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर दोन तासांत तर छत्रपती संभाजीनगर ते नागपूर हे अंतर 4 तासांत पूर्ण होईल. त्यामुळे पुण्याहून नागपूरला फक्त 6 तासांत जाता येईल.

पंतप्रधानपदी मोदी आणि मी मंत्री झालो त्यावेळी देशातील अ‍ॅटोमोबाईल इंडस्ट्री 7 लाख कोटींची होती, तर निर्यात 2 लाख कोटींची होती, असे सांगून गडकरी म्हणाले, आज आपल्या देशाची अ‍ॅटोमोबाईल इंडस्ट्री 12.50 लाख कोटींची झाली आहे. निर्यात क्षमता 4 लाख कोटींची झाली आहे. साडेचार कोटी युवकांना रोजगार दिले आहेत. सर्वाधिक जीएसटी अ‍ॅटोमोबाईल इंडस्ट्री देत आहे. आता भारताला जगात नंबर एक करण्याचे ध्येय आहे. त्यासाठी 25 लाख कोटींची इंडस्ट्री करायची आहे. त्यानुसार वाटचाल सुरू असून, गेल्या चार महिन्यांत जगात भारत सातव्या स्थानावरून तिसर्‍या स्थानावर आला आहे. जपानलाही भारताने मागे टाकले आहे, असेही त्यांनी सांगितले.

माजी पालकमंत्र्यांनी वाढीव फीचाही विचार करावा

गॅस सिलिंडरच्या महागाईवर बोलणार्‍या माजी पालकमंत्र्यांनी आपली शांतिनिकेतन शाळा आणि डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वाढीव फीचाही विचार करावा, असा टोला खा. धनंजय महाडिक यांनी आ. सतेज पाटील यांचे नाव न घेता लगावला.

खा. महाडिक म्हणाले, पायाभूत सुविधांच्या खर्चात वाढ झाल्याने प्रत्येक क्षेत्रास दरवाढीचा फटका बसतो. याचा विचार न करता माजी पालकमंत्री मात्र गॅस सिलिंडरच्या वाढीव किमतीवर बोलतात. मात्र, ते आपल्या शाळा आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वाढीव फीचा विचार करीत नाहीत. शाळेची फी आज एक लाखावर गेली म्हणजे सहापट वाढली, तर अभियांत्रिकी कॉलेजची फी 35 हजारांवरून दोन लाखांवर पोहोचली आहे. यावेळी खा. संजय मंडलिक, भाजपचे नेते सुनील देवधर उपस्थित होते. सूत्रसंचालन चारुदत्त जोशी यांनी केले.

Back to top button