Sharjeel Imam : प्रक्षोभक भाषणे देणाऱ्या शरजील इमामला जामीन मंजूर | पुढारी

Sharjeel Imam : प्रक्षोभक भाषणे देणाऱ्या शरजील इमामला जामीन मंजूर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: अलीगड मुस्लिम विद्यापीठ तसेच दिल्लीतील जामिया विद्यापीठासह देशाच्या इतर भागात प्रक्षोभक भाषणे देण्याचा आरोप असलेल्या शरजील इमाम (Sharjeel Imam) याचा जामीन अर्ज साकेत न्यायालयाने शुक्रवारी (दि. ३०) मंजूर केला. नागरिकता विधेयकाविरोधात आंदोलन सुरू असताना इमाम याने ठिकठिकाणी ही भाषणे केली होती.

30 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर इमाम (Sharjeel Imam) याला जामीन देण्यात आला असला, तरी इतर गुन्हे दाखल असल्याने त्याला सध्या तरी तुरुंगातच राहावे लागणार आहे. शरजील इमामच्या विरोधात गैरकृत्ये प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तसेच देशद्रोहाचा गुन्हा दाखल आहे. ही दोन्ही प्रकरणे दिल्ली उच्च न्यायालयात प्रलंबित आहेत. गेल्या 24 जानेवारी रोजी पूर्व दिल्लीतील एका न्यायालयाने इमामविरोधात देशद्रोहासह इतर आरोपांखाली दोषारोपपत्र दाखल केले होते.

आसामला देशाच्या उर्वरित भागाशी जोडणाऱ्या चिंचोळ्या पट्टीला (चिकन नेक) तोडण्याची भाषा इमामने केली होती. इमामने अलिगड मुस्लिम विद्यापीठात दिलेल्या भाषणाविरोधात पाच राज्यात गुन्हे दाखल झाले होते. त्यात दिल्ली, आसाम, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरचा समावेश होता. इमाम याला पोलिसांनी बिहारमधून अटक केली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button