

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या खासदार कंगना रनौत यांनी बुधवारी (दि. १८) काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राहुल गांधी यांचे वर्तन 'टपोरी' प्रकाराचे असून त्यांच्यामुळे महिलांना असुरक्षितता जाणवते, असे खळबळजनक विधान कंगना यांनी केले आहे.
संसदेच्या मकर द्वार येथे बसून चहा-बिस्कीट खाल्ल्याप्रकरणी माजी सनदी अधिकाऱ्यांनी राहुल गांधींना माफी मागण्याचे खुले पत्र लिहिले होते. या प्रकरणावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना कंगना बोलत होत्या.
संसद परिसरात माध्यमांशी संवाद साधताना कंगना म्हणाल्या, ‘आम्हा महिलांना त्यांच्याकडे पाहून अत्यंत अस्वस्थ वाटते. ते अगदी एखाद्या टपोरीसारखे येतात आणि कोणाशीही बोलताना 'ए तू' अशा एकेरी भाषेचा वापर करतात. जर कोणी मुलाखत देत असेल, तर ते तिथे येऊन हुल्लडबाजी करतात,’ असा आरोप केला आहे.
कंगना यांनी पुढे असेही नमूद केले की, राहुल गांधींनी आपली बहीण आणि वायनाडच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांच्याकडून शिष्टाचार शिकले पाहिजेत, कारण त्यांचे वागाणे अत्यंत सुसंस्कृत आहे.’ अशा कठोर शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
जम्मू-काश्मीरचे माजी पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांच्या नेतृत्वाखाली ८४ माजी सनदी अधिकारी, ११६ माजी सैनिक आणि चार वकिलांनी राहुल गांधींच्या वर्तनावर तीव्र आक्षेप घेतला आहे. १२ मार्च रोजी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राहुल गांधी संसदेच्या मकर द्वारावर सहकाऱ्यांसोबत घोषणाबाजी करत चहा-बिस्कीट खाताना दिसले होते.
या पत्रात स्वाक्षरी करणाऱ्यांनी म्हटले आहे की, ‘ही घटना अत्यंत चिंताजनक असून ती संसदीय अधिकाराचा जाणीवपूर्वक केलेला अवमान दर्शवते. राहुल गांधी यांचे हे वागणे विरोधी पक्षनेते पदाला साजेसे नसून त्यातून त्यांचा अहंकार आणि उद्दामपणा दिसून येतो.’
या संदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना एस. पी. वैद्य म्हणाले, ‘राहुल गांधी ज्या विरोधी पक्षनेते पदावर आहेत, ते अत्यंत जबाबदारीचे पद आहे. संसदेच्या पायऱ्यांवर बसून चहा पिणे आणि नाटकबाजी करणे हे त्यांच्या पदाची प्रतिष्ठा कमी करणारे आहे. कदाचित राहुल गांधींना या पदाचे महत्त्व अद्याप समजलेले नाही.’ या वर्तनाबद्दल राहुल गांधींनी जाहीर माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.