वाराणसीत छतावर ‘पांढरे भूत’ : व्हिडिओ व्हायरल झाल्‍याने रहिवाशांमध्ये भीती, गुन्हा दाखल | पुढारी

वाराणसीत छतावर 'पांढरे भूत' : व्हिडिओ व्हायरल झाल्‍याने रहिवाशांमध्ये भीती, गुन्हा दाखल

वाराणसी (उत्त्तर प्रदेश); पुढारी ऑनलाईन : वाराणसी शहरात एका घराच्या छतावर पांढऱ्या कपड्यातील एक आकृती चालत असल्‍याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी भेलूपूर पोलिस स्‍टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, वाराणसीमध्ये घराच्या छतावर पांढरे कपडे घातलेले ‘भूत’ फिरतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ बडी गैबी परिसरातील व्हीडीए कॉलनीतील असल्‍याचे समोर आले आहे. या व्हिडिओमध्‍ये एक सावली येथील घराच्या छतावरून चालताना दिसत आहे.  व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्‍या प्रमाणात व्हायरल झाल्‍याने शहरातील लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका यूजरने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. दरम्‍यान, या परिसरातील प्रत्‍यक्षदर्शींनी पोलिसांना तपासाची मागणी केली आहे.

दरम्‍यान, सोशल मीडियावर आणखी काही व्हिडिओही समोर आले आहेत. ज्‍यामुळे नागरिकांमध्‍ये उलटसूलट चर्चा सुरू आहेत. काहींच्या मते हा बनावट व्हिडीओ आहे, मात्र काहींनी या व्हिडीओची भलतीच धास्‍ती घेतली आहे.लोकांमधली ही अनाठायी भीती घालवण्यासाठी काही स्‍थानिकांनी पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी केली. या प्रकरणी भेलुपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भेलूपूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक रमाकांत दुबे म्हणाले लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांच्या तक्रारीवरून आम्ही अज्ञात व्यक्तीं विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच परिसरातही गस्त वाढवण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे की, वाराणसीमध्ये अशी कोणतीही घटना घडली नाही. त्‍यामुळे यापुढे असले व्हिडिओ व्हायरल न करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा :  

Back to top button