इथेनॉल वर भविष्यातील वाहने चालणार! | पुढारी

इथेनॉल वर भविष्यातील वाहने चालणार!

नवी दिल्ली : सागर पाटील : जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर कडाडले आहेत. त्याचा परिणाम म्हणून देशात पेट्रोल दराने कधीच शंभरी पार केली आहे. डिझेल दरही शंभरी ओलांडण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे धोरण अवलंबले आहे.

यापुढे जात सर्वप्रकारची वाहने 100 टक्के इथेनॉलवर चालावीत, यासाठी फ्लेक्स फ्यूएल इंजिन विकसित करण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन कंपन्यांना केले आहे.

त्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांबरोबरच भविष्यात 100 टक्के इथेनॉलवर चालणार्‍या गाड्या रस्त्यावर दिसू लागतील. पूर्णपणे इथेनॉलवर चालणारे फ्लेक्स फ्यूएल इंजिन हे इंटरनल कॉम्ब्युत्शन इंजिन असते. ते एका इंधनावर तसेच मिश्रित इंधनावरही चालते. या इंजिनमध्ये कितीही टक्के ब्लेंडचे इंधन ऑटोमेटिक अ‍ॅडजेस्ट करण्याची क्षमता असते.

फ्यूएल कम्पोझिशन सेन्सर तसेच सुटेबल ईसीयू प्रोग्रामिंगमुळे हे इंजिन 100 टक्के पेट्रोल किंवा 100 टक्के इथेनॉलवरही धावू शकते. ब्राझीलबरोबरच कॅनडा आणि अमेरिकेसारख्या देशांत अशी वाहने दिसतात.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या सूचनेनुसार, इंधनाची प्रचंड मागणी असलेल्या आपल्या देशात अशी वाहने आगामी काळात तयार होणार आहेत. पेट्रोलमध्ये केवळ 20 टक्के इथेनॉल मिश्रण हेच सरकारचे उद्दिष्ट नाही, तर ई-100 म्हणजे शंभर टक्के इथेनॉलवर धावणार्‍या वाहनांसाठी इंधन पंपांची उभारणी देशभरात करण्याचीही सरकारची योजना आहे. सुरुवातीच्या काळात सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून अशा पंपांची उभारणी केली जाणार आहे. सध्या असे तीन पंप सुरूही झाले आहेत.

* 2023 पर्यंत इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण 20 टक्क्यांवर नेण्याचे उद्दिष्ट

* पुढच्या वर्षी 10 टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल सर्वच पेट्रोल पंपांवर मिळणार

* वर्षाला आठ लाख कोटी रुपयांच्या इंधनाची देशाची गरज

* पुढील पाच वर्षांत हा आकडा दुपटीने वाढण्याचा अंदाज

* अशा स्थितीत इथेनॉल आधारित आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची गरज

Back to top button