India’s GDP : चालू आर्थिक वर्षात ‘जीडीपी’ दर 7.7 टक्के होण्याचा ‘मुडीज‘चा अंदाज | पुढारी

India's GDP : चालू आर्थिक वर्षात 'जीडीपी' दर 7.7 टक्के होण्याचा ‘मुडीज‘चा अंदाज

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : चालू आर्थिक वर्षात देशाचच सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) दर 7.7 टक्के इतका होण्याचा अंदाज जागतिक पातळीवरील पतमापन संस्था ‘मुडीज‘ने वर्तविला आहे. याआधी 8.8 टक्के ‘जीडीपी’ दराचा अंदाज मुडीजने वर्तवला होता. थोडक्यात, ‘जीडीपी’च्या अंदाज पतमापन संस्थेने एका टक्क्याने घट केली आहे. दरम्यान, आर्थिक वर्ष 2023 च्या विकासदर अंदाजातही कपात करण्यात आली असून 5.4 टक्क्यांच्या तुलनेत 5.2 टक्के विकासदर राहील, असे मुडीजने म्हटले आहे.

जगभरातील आर्थिक अस्थिरतेचा भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम

सरत्या आर्थिक वर्षात भारताचा विकासदर 8.3 टक्के इतका होता. त्या तुलनेत चालू आणि पुढील वर्षी हा दर क्रमश‘ 7.7 व 5.2 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो, असे मुडीजने आपल्या अहवालात नमूद केले आहे. वाढता व्याजदर, मान्सूनच्या पावसाचे असमान वितरण, जगभरात असलेली आर्थिक अस्थिरता या सर्वांचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणे अटळ आहे. वाढत्या व्याजदराचे आव्हान केवळ भारतासमोर नाही तर जगभरात आहे.

चालूवर्षी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया सात टक्क्याने खाली घसरल्याने त्याचाही दबाव वाढत आहे. व्याजाचा हा दबाव दुसऱ्या सहामाहीत तसेच पुढील वर्षी कमी होऊ शकतो. जगभरात कमॉडिजीटच्या किंमती कमी झाल्या तर अर्थव्यवस्थेला गती मिळू शकेल. याशिवाय खासगी क्षेत्राचा क्षमता विस्तार अर्थव्यवस्थेला पोषक ठरु शकतो, असे मुडीजने अहवालात म्हटले आहे.

Back to top button