Loksabha election | रिंगरोडमुळे पुण्याचे भाग्य बदलणार; देवेंद्र फडणवीसांचे मत | पुढारी

Loksabha election | रिंगरोडमुळे पुण्याचे भाग्य बदलणार; देवेंद्र फडणवीसांचे मत

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रिंगरोड आणि नव्या विमानतळामुळे पुणे शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून अडीच हजार कोटींची नवी गुंतवणूक या शहरात होईल. पुण्याला देशातील सर्वोत्तम शहर करण्याचा भाजपचा संकल्प आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. भाजप आणि महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ गुरुवारी (दि.9) रात्री बाणेर येथील सावरकर उद्यानात आणि पर्वतीमधील मुक्तांगण शाळेच्या मैदानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली. या वेळी ते बोलत होते.

या वेळी व्यासपीठावर मुरलीधर मोहोळ यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, खा. मेधा कुलकर्णी, माजी मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे, हर्षवर्धन पाटील, आमदार माधुरी मिसाळ, राज्य संघटक राजेश पांडे, मकरंद देशपांडे, गणेश बिडकर, अमोल बालवडकर, प्रदीप देशमुख, सुभाष जगताप, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, लहू बालवडकर, मधुकर मुसळे यांच्यासह भाजप व महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ही निवडणूक देशाला दिशा देणारी व देशाचे नेतृत्व ठरवणारी आहे. हे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे. विरोधकांकडे विकासाच्या विरोधात बोलण्यासाठी मुद्दे नाहीत. त्यामुळे ते मोदी सत्तेवर आले तर संविधान बदलणार असे म्हणत आहेत. मात्र चंद्र-सूर्य असेपर्यंत देशाचे संविधान राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षांत देशात आणि पुण्यात विकासाची गंगा आणली. समाजातील प्रत्येक घटकासाठी काम केले. बारा बलुतेदारांसाठी विश्वकर्मा योजना आणली. देशात 2026 नंतर 33 टक्के महिला आमदार व खासदार असतील. केंद्राकडून प्रत्येकाच्या घरावर सोलर यंत्रणा बसविण्यात येणार असून मोंदीमुळे पुण्याचा चेहरामोहरा बदलला आहे.

त्यांनी पुण्यातील नद्या शुद्ध करण्यासाठी व सांडपाण्याच्या व्यवस्थापनासाठी मोठा निधी दिला. शहरात मेट्रोचे जाळे वाढवण्यात येणार असून पुण्याला टेक्नॉलॉजीचे शहर करण्यासाठी नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधान होणे गरजेचे आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, मोदी यांनी मागील दोन्ही निवडणुकीत विक्रम केले. 2014 ला 18 कोटी, 2019 ला 23 कोटी तर आता 2024 ला 30 कोटी लोक भाजपला मतदान करतील. दरम्यान, मतदानाचा टक्का वरचेवर घसरत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान करून घेण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. मोहोळ म्हणाले, प्रचारादरम्यान पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मोदींना पंतप्रधान करण्यासाठी मत देण्याची परंपरा पुणेकर कायम ठेवतील, असा विश्वास आहे.

हेही वाचा

Back to top button