NCRB Suicide Data : आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर, सरत्या वर्षात 22 हजार 207 लोकांनी जीवन संपवले | पुढारी

NCRB Suicide Data : आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर, सरत्या वर्षात 22 हजार 207 लोकांनी जीवन संपवले

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : आत्महत्यांच्या बाबतीत देशात महाराष्ट्र आघाडीवर असून सरत्या वर्षात म्हणजे 2021 साली राज्यात 22 हजार 207 लोकांनी आत्महत्या केल्या होत्या, अशी माहिती नॅशनल क्राईम ब्युरो रेकाॅर्ड्स अर्थात एनसीआरबीकडून देण्यात आली आहे. संपूर्ण देशाचा विचार केला तर गतवर्षी 1 लाख 64 हजार 33 लोकांनी आत्महत्या केल्या होत्या.

व्यवसाय अथवा करियरमध्ये समस्या येणे, एकटेपणाची भावना, शिवीगाळ आणि हिंसाचार, कौटुंबिक समस्या, मानसिक विकृती, जास्त प्रमाणात मद्यपान, आर्थिक नुकसान, शारिरीक आजार ही आत्महत्येची प्रमुख कारणे असल्याचे पाहणीत दिसून आले आहे. वर्ष 2020 मध्ये 1 लाख 53 हजार 52 लोकांनी आत्महत्या केल्या होत्या. त्या तुलनेत 2021 साली झालेली आत्महत्येतील वाढ 7.2 टक्क्यांनी जास्त आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 22 हजार 207 लोकांनी आत्महत्या केल्या. त्यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 18 हजार 925, मध्य प्रदेशात 14 हजार 965 लोकांनी आत्महत्या केल्या. याशिवाय प. बंगालमध्ये 13 हजार 500, कर्नाटकमध्ये 13 हजार 56 लोकांनी आत्महत्या केल्या. वरील राज्यांतील आत्महत्येची टक्केवारी क्रमशः 13.5 टक्के, 11.5 टक्के, 9.1 टक्के, 8.2 टक्के आणि 8 टक्के इतकी होती.

वरील पाच राज्यांची एकूण टक्केवारी 50.4 टक्के इतकी भरते. थोडक्यात वरील पाच राज्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट होते. उर्वरित 23 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांतील आत्महत्येची टक्केवारी 49.6 टक्के इतकी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत आघाडीवर असलेल्या उत्तर प्रदेशात आत्महत्यांचे प्रमाण कमी आहे. याठिकाणची टक्केवारी केवळ 3.6 टक्के इतकी आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार जगात दरवर्षी सात लाखांपेक्षा जास्त लोक आत्महत्या करतात. विशेषतः 15 ते 29 वयोगटातील युवकांमध्ये आत्महत्या हे मृत्यूचे चैथे प्रमुख कारण आहे. गतवर्षी आत्महत्या केलेल्यांपैकी 64 टक्के लोकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षाही कमी होते. तसेच 32 टक्के लोकांचे उत्पन्न एक ते पाच लाख रुपयांच्या दरम्यान होते.

आत्महत्या केलेल्यांपैकी 25 टक्के लोक रोजंदारीवरील कामगार होते. 14 टक्के गृहिणी होत्या. 12 टक्के लोकांचा व्यवसाय होता तर 8.4 टक्के लोक बेरोबजगार होते. याशिवाय आत्महत्या केलेले 24 टक्के लोक दहावी किंवा बारावीपर्यंत शिकेलेले होते तर 11 टक्के लोक निरक्षर होते. पदवी किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलेले फक्त 4.6 टक्के लोक आत्महत्या करणाऱ्यांत सामील होते.

Back to top button