अग्‍निवीर नोंदणीस युवकांचा मोठा प्रतिसाद | पुढारी

अग्‍निवीर नोंदणीस युवकांचा मोठा प्रतिसाद

नवी दिल्ली , पुढारी वृत्तसेवा :  भारतीय हवाई दलाकडे अग्‍निपथ भरती योजनेंतर्गत 56 हजार 960 अर्ज दाखल झाले आहेत. या योजनेसाठी नोंदणी प्रक्रियेविरोधात देशातील अनेक राज्यांत हिंसक आंदोलन झाले होते. पण, नोंदणीसाठी मिळालेला प्रतिसाद पाहून या आंदोलनांचा किती परिणाम झाला, तेही स्पष्ट झाले आहे. शुक्रवारपासून नोंदणी प्रक्रियेस सुरुवात झाली. त्यानंतर हवाई दलाने ‘56960!’ असे ट्विट केले आहे. हा आकडा अग्‍निपथ भरती प्रक्रियेत संकेतस्थळावर प्राप्‍त अर्जांचा एकूण आकडा आहे. नोंदणीची मुदत 5 जुलैपर्यंत आहे.

14 जून रोजी अग्‍निपथ योजना सादर करताना सरकारने म्हटले होते की, साडे सतरा ते 21 या वयोगटातील युवकांची चार वर्षांसाठी भरती केली जाईल. यातील 25 टक्के युवकांना नंतर नियमित सेवेत सहभागी करून घेतले जाईल. या योजनेत पेन्शन नसल्याने देशात अनेक ठिकाणी योजनेविरोधात हिंसक आंदोलने झाली होती. पण, सरकारने 16 जून रोजी या योजनेंतर्गत भरतीची वयोमर्यादा या वर्षीसाठी 21 वरून 23 वर्षे केली होती.

तसेच सेवानिवृत्तीनंतर केंद्रीय अर्धसैनिक दलात आणि भारत सरकारच्या इतर उपक्रमांमध्ये प्राधान्य दिले जाईल, अशी घोषणा केली होती. भाजपशासित अनेक राज्यांनी अग्‍निवीरांना राज्याच्या पोलिस दलांमध्ये सहभागी करून घेण्यात प्राधान्य दिले जाईल, अशी घोषणा केली होती. दरम्यान, या योजनेविरोधात हिंसाचार, जाळपोळ करणार्‍यांना भरती प्रक्रियेत सामील केले जाणार नाही.

अग्‍निवीरांची वयोमर्यादा 65 वर्षे करा ः ममता बॅनर्जी

कोलकाता : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी केंद्र सरकारकडे अग्‍निपथ योजनेतून भरती होणार्‍या अग्‍निवीरांची निवृत्तीची वयोमर्यादा वाढवून 65 वर्षे करावी, अशी विनंती केली. चार वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांच्या भविष्य अधांतरी असेल. लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन ही योजना भाजपने आणली आहे, असे त्या म्हणाल्या.

पंतप्रधान त्यांच्या मित्रांना देशातील विमानतळे 50 वर्षांसाठी देत दौलतवीर  बनवत आहेत आणि युवकांना केवळ 4 वर्षांच्या करारावर अग्‍निवीर बनवले जात आहे. जोपर्यंत युवकांना न्याय मिळत नाही, तोपर्यंत या योजनेविरोधातील काँग्रेसचा सत्याग्रह थांबणार नाही.

– राहुल गांधी, काँग्रेस नेते

Back to top button